नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अल्पवयीन मुलावरील अनैसर्गिक अत्याचार प्रकरणातील आरोपीची सात वर्षे कारावास व इतर शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्ती विनय जोशी यांनी हा निर्णय दिला. हे प्रकरण अमरावती जिल्ह्यातील आहे.
रूपेश विजय राऊत असे आरोपीचे नाव असून, तो व्यवसायाने मजूर आहे. २७ ऑगस्ट २०१९ रोजी विशेष सत्र न्यायालयाने आरोपीला अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करण्याच्या गुन्ह्यात दोषी ठरवून ७ वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. त्याविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने ते अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. घटनेच्या वेळी पीडित मुलगा १७ वर्षे वयाचा होता. आरोपीने ठार मारण्याची धमकी देऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. वलगाव पोलिसांनी प्रकरणाचा तपास केला.