नागपूर : ओमायक्रॉन विषाणूचा संभाव्य धोका लक्षात घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) येथे ऑक्सिजनसह सर्व सुविधा असलेला स्वतंत्र कक्ष सुरु करावा. तसेच पोस्ट कोविड रुग्णांची तपासणी व त्यांना मार्गदर्शन करण्यासाठीसुद्धा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्वतंत्र कक्ष सुरु करुन त्यांना आहार व आरोग्याविषयी माहिती देण्यात यावी, अशा सूचना पालकमंत्री नितीन राऊत यांनी साेमवारी दिल्या.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात ओमायक्रॉन विषाणूपासून संभाव्य धोक्याच्या पातळीवर वरिष्ठ अधिकारी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, विभागीय टास्क फोर्सचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक पालकमंत्री राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी आर. विमला, जिल्हा पोलीस अधीक्षक विजय मगर, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, मेयोच्या डॉ. तायडे, आरोग्य उपसंचालक संजय जैस्वाल, टास्क फोर्सचे डॉ. मिलिंद भुरसुंडी, डॉ. सरनाईक, अतिरिक्त आयुक्त राम जोशी आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
लसीकरण झालेल्या नागरिकांना ओमायक्रॉनचा संभाव्य धोका कमी आढळल्याची माहिती टास्कफोर्सतर्फे दिली. त्यामुळे लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. जिल्ह्यात येत्या दहा दिवसांत लसीकरण पूर्ण करावे, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी दिले. लसीकरणासाठी ग्रामीण भागातील सरपंच, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी यांची मदत घ्यावी, असेही सांगितले.
ओमायक्रॉन विषाणूचा धोका टाळण्यासाठी बालरोगतज्ज्ञांचा समावेश असलेली टास्क फोर्स त्वरित नेमावी व या टास्क फोर्समार्फत जिल्ह्यातील बालरोगतज्ज्ञांना मार्गदर्शन व उपचार पद्धतीबाबत माहिती देण्यात यावी, बालकांच्या लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर प्राधान्याने लसीकरण करण्यासाठी शहर व ग्रामीण भागात नियोजन करावे, असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आवश्यक औषध पुरवठा तसेच ऑक्सिजन, व्हेंटिलेटर आदींचाही आढावा यावेळी घेण्यात आला.