लोकसभेच्या उमेदवारीवरून नागपुरात काँग्रेस विभागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 10:42 AM2018-07-23T10:42:51+5:302018-07-23T10:48:13+5:30

लोकसभेची निवडणूक तोंडावर असताना, नागपुरात भाजपाचे तगडे आव्हान असतानाही काँग्रेसमधील गटबाजी शमण्याची चिन्हे नाहीत.

Separation in Congress before Loksabha election in Nagpur | लोकसभेच्या उमेदवारीवरून नागपुरात काँग्रेस विभागली

लोकसभेच्या उमेदवारीवरून नागपुरात काँग्रेस विभागली

Next
ठळक मुद्देमुत्तेमवार, तायवाडे, ठाकरे यांचा दावाराऊत, गुडधेंसाठी विरोधक एकत्र

कमलेश वानखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभेची निवडणूक तोंडावर असताना, नागपुरात भाजपाचे तगडे आव्हान असतानाही काँग्रेसमधील गटबाजी शमण्याची चिन्हे नाहीत. आता तर उमेदवारीवरून कबड्डी सुरू झाली आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार हे स्वत: इच्छुक असल्याचे समर्थक सांगतात. त्यांच्या गटाकडून ओबीसी नेते डॉ. बबनराव तायवाडे व शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांचेही नाव आहे. तर तीन माजी मंत्र्यांच्या गटानेही एकत्र येत मोट बांधली असून, नगरसेवक प्रफुल्ल गुडधे यांचे नाव समोर केले आहे. एकूणच भाजपाशी लढण्यापूर्वी काँग्रेसमध्येच अंतर्गत लढाई होण्याची चिन्हे आहेत.
गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे माजी केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार यांना भाजपा नेते केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी २ लाख ८४ हजार ८४८ मतांनी पराभूत केले होते. गडकरींचे हे मताधिक्य अनपेक्षित होते. राजकीय धुरिणांनी वर्तविलेल्या अंदाजापेक्षा हा मोठा विजय होता. गडकरींनी लावलेला विकास कामांचा सपाटा पाहता काँग्रेसला नागपुरात खूप घाम गाळावा लागणार आहे. मात्र, अंतर्गत गटबाजीमुळे काँग्रेसलाच घाम फुटतोय की काय, अशी परिस्थिती आहे.
लोकसभेच्या उमेदवारीवरून दोन्ही गटांनी महाराष्ट्र प्रभारी खा. मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे दिल्लीत बाजू मांडली. अधिवेशन काळात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही आढावा घेतला. गेल्या शनिवारी अ.भा. काँग्रेस समितीचे महासचिव व राजस्थान प्रभारी अविनाश पांडे यांच्या नागपुरात दौऱ्यातही भेटीगाठी घेऊन खलबते झाली. नितीन राऊत, अनिस अहमद, सतीश चतुर्वेदी या माजी मंत्र्यांच्या समर्थकांसह मुत्तेमवार गटावर नाराज असलेल्यांनी प्रफुल्ल गुडधे यांच्या नावाची शिफारस केल्याची माहिती आहे.
तर मुत्तेमवार गटाने आपला दावा आणखी प्रबळ करीत काही कारणास्तव मुत्तेमवार यांचे नाव मागे पडले तर डॉ. बबनराव तायवाडे किंवा विकास ठाकरे यांचे नाव समोर करण्याची रणनीती आखली आहे.
विकास ठाकरे यांनी आपण इच्छुक नसल्याचे प्रदेशाध्यक्षांकडे आधीच स्पष्ट केले आहे. अविनाश पांडे यांनीही आपण इच्छुक नसल्याचा खुलासा केला आहे. माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक हे देखील आपण इच्छुक नसल्याचे सांगत आहेत. तर राऊत यांनी मात्र आपण स्वत: इच्छुक असल्याचे यापूर्वीच जाहीर केले आहे. उमेदवारीवरून काँग्रेस दोन गटात विभागली असल्याने कार्यकर्तेही चिंतित आहेत. प्रत्यक्ष तिकीट वाटपानंतर काँग्रेस नेते गटबाजी विसरून ‘पंजा’ उंचावतात की आपसातच पंजा लढवतात, याकडे राजकीय वर्तुळासह काँग्रेसी मतदारांचेही लक्ष लागले आहे.
गेल्या अडीच वर्षांत काँग्रेसमधील गटबाजी आणखी वाढली. एकीकडे संघटन बांधणीसाठी काही पदाधिकारी धडपड करताना दिसले तर दुसरीकडे काहींनी फटाके लावण्याचा कार्यक्रम सातत्याने सुरू ठेवला. महापालिकेच्या निवडणुकीत गटबाजी उफाळून आली. तिकिटांची कापाकापी झाली. डबल ए-बी फॉर्मचा घोळ झाला.
एवढ्यावरच न थांबता अनेकांनी नेत्यांच्या छुप्या पाठबळावर काँग्रेस उमेदवाराविरोधात उघडपणे बंडखोरी केली. पूर्व नागपुरातील प्रचार सभेत प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यावर शाई फेकण्यापर्यंत प्रकरण टोकाला गेले होते. अजूनही गटबाजीचे चित्र तसेच आहे. सर्वच दबा धरून कुरघोडीसाठी संधीची वाट पाहत आहेत. केव्हा कुणाचा पत्ता सरळ पडेल, याचा नेम नाही.

शह-काटशह सुरूच
महापालिकेच्या निवडणुकीनंतर पुढचे एक वर्ष एकमेकांविरोधात दिल्लीवारी झाल्या. माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांना पक्षातून काढण्यात आले. या सर्व वादात शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांना हटविण्यासाठी विरोधकांनी जोर लावल्यानंतरही ठाकरेंचे पद अढळ राहिले. पण, यानंतर विरोधी गटालाही संजीवनी मिळाली. माजी मंत्री नितीन राऊत यांची अ.भा. काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली. काही दिवसांनी महाराष्ट्र प्रभारी खा. मोहन प्रकाश पदमुक्त झाले आणि नुकतेच विलास मुत्तेमवार यांनाही अखिल भारतीय काँग्रेस कार्य समितीमधून बाहेर ठेवण्यात आले. त्यामुळे मुत्तेमवार विरोधी गट चांगलाच सुखावला. गल्लीपासून दिल्लीपर्यंत शह-काटशहाचे राजकारण राजरोसपणे सुरू आहे.

Web Title: Separation in Congress before Loksabha election in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.