नागपूर - जळणारा व्यक्ती हाताची घडी बांधून एका ठिकाणी बसेल काय,असा प्रश्न करून निकिता चाैधरी जळीतकांडाचा तपास पोलिसांनी योग्य पद्धतीने केला नाही. हा हत्येचाच प्रकार असून पोलीस त्याला आत्महत्येचे स्वरूप देत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्या ज्वाला जांबूवंतराव धोटे यांनी आज पत्रकार परिषदेतून केला. निकिताच्या मृत्यूमुळे तिचे नातेवाईक शोक संतप्त आहेत. मात्र, त्यांना न्याय देण्याऐवजी पोलीस मनस्ताप देत असल्याचा आरोप करून ज्वाला धोटे यांनी पत्रकार परिषदेत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले.
१६ मार्चला निकिताचे जळीतकांड उघड झाल्यापासून या प्रकरणात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. निकितावर अत्याचार करून तिची जाळून हत्या करण्यात आल्याचा आरोप वजा तक्रार तिच्या नातेवाईकांनी पोलिसांकडे केली आहे. पोलीस योग्य तपास करीत नाहीत,असा आरोपही त्यांनी केला असून या संबंधाने ज्वाला धोटे यांनी कॅण्डल मार्च काढून प्रतापनगर पोलीस ठाण्याला घेरावही केला आहे. दुसरीकडे वाडी पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात या प्रकरणाचा तपास करून सीसीटीव्ही फुटेज,ऑटोचालक, निकिताचे मित्र,मैत्रीणीचे जबाब,त्यांचे मोबाइल कॉल्स,चॅटिंग आणि डॉक्टरांनी दिलेला पोस्टमार्टम अहवालाच्या आधारे निकिताची हत्या झाली नाही किंवा तिच्यावर कुणी अत्याचारही केला नाही, असा निष्कर्ष काढला. तिने मित्राकडून मिळणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा निष्कर्ष नोंदवून पोलिसांनी तिच्या राहुल नामक मित्राविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला. मात्र, निकिताच्या नातेवाईकांचा त्यावर विश्वास नाही. निकिताची हत्याच झाल्याचे त्यांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर,ज्वाला धोटे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यात निकिताचे वडील लखन चाैधरी,आई पूजा,भाऊ आकाश आणि हर्ष चाैधरी तसेच प्रणय शेंडे,अंजली डहाट, अविनाश शेरेकर,राजू रहाटे,मनीष जयस्वाल आदी उपस्थित होते.
...तर न्यायालयातून न्याय मिळवूपत्रकार परिषदेत उपरोक्त मंडळींनी पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह लावले. पोलीस निकिता आणि तिच्या कुटुंबीयांना न्याय देत नसेल तर,आम्ही न्यायालयातून न्याय मिळवू, असेही त्यांनी पत्रकारांना सांगितले.