लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खापा वनपरिक्षेत्रातील बिबट मादी व तिचे पिल्लू यांच्या पाण्याअभावी झालेल्या मृत्यूप्रकरणात वन परिक्षेत्र अधिकारी प्रवीण नाईक यांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीत खोटारडेपणा असल्याचा गंभीर आराेप नागपूर जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक अविनाश लाेंढे यांनी केला आहे.
अविनाश लाेंढे यांनी बिबटांच्या मृत्यूपासून ते शवविच्छेदनापर्यंत घडलेल्या घडामाेडींवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या मते शवविच्छेदन करण्याकरिता सावनेर येथील पशुधन विकास अधिकारी रोहिणी बावसकर यांच्यासह वनविभागाच्या ट्रान्झिट सेंटरचे डॉ बिलाल अली उपस्थित असल्याचे सांगण्यात आले. मात्र डाॅ. बिलाल हे संपूर्ण दिवस नागपुरातील बिबट शोध मोहिमेत होते व ते खापा येथे गेलेच नसल्याने त्यांची उपस्थिती दर्शविणे हा वनपरिक्षेत्र अधिकारी यांचा खाेटेपणा उघड करीत असल्याचा आराेप लाेंढे यांनी केला.
बिबट शेड्युल एक मध्ये येतो तेव्हा उपवनसंरक्षक किंवा सहायक वनसंरक्षक यांनी घटनास्थळी जाण्याचे का टाळले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. इतकी मोठी घटना घडली असतांना अधिकारी घटनास्थळी का पोहचले नाही? त्यांना बिबट मादी व पिल्लू यांच्या मृत्यूचे गांभीर्य नसल्याचे दिसते. दोघांचेही मृत्यू पाणी न मिळाल्याने झाले आहेत. शवविच्छेदनसमध्ये त्यांचे सर्व अंतर्गत अवयव डिहायड्रेट झालेले आढळले. वन्यजीवांना उन्हाळ्यात पाणी पुरवणे हे वनधिकाऱ्यांचे काम आहे. पाण्याअभावी वन्यजीवांचा मृत्यू होणे ही अतिशय गंभीर बाब असून जबाबदार वन अधिकाऱ्यावर कारवाई हाेणे आवश्यक असल्याची मागणी लाेंढे यांनी केली.
मानद वन्यजीव रक्षकाची भूमिका संशयास्पद
नागपूर जिल्ह्यात चार मानद वन्यजीव रक्षक आहेत. असे असताना त्या अधिकाऱ्याला कुणीच कसे नाही मिळाले? मानद वन्यजीव रक्षकाचा प्रतिनिधी म्हणून आशिष कोहळे याला शवविच्छेदन दरम्यान नेमले किंवा मानद वन्यजीव रक्षकाने स्वतः न जाता प्रतिनिधी कसा पाठवला, त्यांना प्रतिनिधी ठेवायचा अधिकार कुणी दिला? परराज्यातून नागपूरचा मानद वन्यजीव रक्षकाचा कारभार चालवायचा असेल तर मानद वन्यजीव रक्षक बनून एक जागा का अडवली, असे गंभीर प्रश्न उपस्थित करीत संपूर्ण प्रकरणात गंभीर दखल घेऊन कठाेर कारवाईची मागणी अविनाश लाेंढे यांनी केली आहे.