लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : शासन कोरोनासारख्या गंभीर महामारीवर अधिक गंभीर आहे. लॉकडाऊन, मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईसोबतच कोरोना लसीकरणाचा नियोजबद्ध कार्यक्रम शासन जाहीर करीत आहे. दुसरीकडे दिवसेंदिवस रुग्णांचीही संख्या वाढत आहे. कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असला, तरी उमरेड तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा याबाबत गंभीर दिसून येत नाही. उमरेड तालुक्यात कोविड सेंटरच नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
कोरोना महामारीच्या पहिल्या टप्प्यात उमरेड तालुक्यातील रुग्णांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतिगृह याठिकाणी कोरोना सेंटर होते. भिवापूर आणि कुहीच्या तुलनेत या सेंटरमधील सुविधा व्यवस्थित होती. अशातच शाळा सुरू झाल्याने. विद्यार्थ्यांनी वसतिगृहाची वाट धरली. विद्यार्थी वसतिगृहात परतल्याने येथील कोविड सेंटर बंद पडले. अन्य कुठेही खासगी, शासकीय सुविधेची इमारत मिळाली नाही, अशी टेप आता अधिकारी वाजवत असून, उमरेड तालुक्यातील कोरोना रुग्णांना भिवापूर येथील कोविड सेंटरमध्ये पाठविले जात आहे. भिवापूरच्या कोविड सेंटरमध्ये ७ ते ८ रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप धरमठोक यांनी दिली. उमरेडसारख्या महत्त्वपूर्ण तालुक्यात कोविड सेंटर नसावे, यावर आश्चर्य व्यक्त होत आहे. आपत्ती व्यवस्थापन समितीने या गंभीर बाबीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे. या गंभीर प्रकरणी तहसीलदार प्रमोद कदम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.
....
रुग्णांचा उलटा प्रवास
उमरेड येथून भिवापूर कोविड सेंटरला भरती झाल्यानंतर एखाद्या रुग्णाची प्रकृती बिघडली. रुग्णावर तातडीने उपचार करावयाची वेळ आल्यास सदर कोरोना रुग्णाला पुन्हा उमरेड आणि त्यानंतर नागपूरचा उलटा प्रवास करावा लागणार आहे. या अधिक लांबच्या प्रवासादरम्यान रुग्ण अधिक गंभीर झाल्यास वा दगावल्यास जबाबदारी कुणाची, असाही सवाल विचारला जात आहे.
....
१,२६३ काेराेनाबाधित
उमरेड तालुक्यात कोरोनाबाधितांची आकडेवारी १,२६३ झालेली आहे. यामध्ये शहरातील ७६२, ग्रामीण भागातील ४८३ तर इतर ठिकाणच्या ११ रुग्णांचा समावेश आहे. आतापावेतो १,१६४ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, ५४ रुग्णांवर औषधोपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनामुळे ४२ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
...
उमरेड येथे जागा उपलब्ध होऊ न शकल्याने कोविड सेंटरची सुविधा नाही. यामुळे येथील रुग्णांना भिवापूर येथे पाठविले जात आहे. भिवापूर येथे दोन वैद्यकीय अधिकारी आणि अन्य ८ ते १० कर्मचारी उपलब्ध आहेत.
- डॉ. संदीप धरमठोक,
तालुका आरोग्य अधिकारी, उमरेड.