लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोबत दारू पिताना किरकोळ कारणावरून वाद उद्भवला. दारूच्या नशेत राग अनावर झाल्याने नोकराने ढाबा मालकाच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून त्याची हत्या केली. ही घटना हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिंगणा आऊटर रिंगरोडलगत असलेल्या ढाब्यावर शुक्रवारी (दि. ३१) मध्यरात्री १२ वाजताच्या सुमारास घडली असून, शनिवारी (दि. १) सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
प्रवीण नागोराव सातपुते (४०, रा. वागदरा, इसासनी, ता. हिंगणा) असे मृत ढाबा मालकाचे तर निखिल विजय धाबर्डे (२९, रा. जोगेश्वरपुरी, तहसील कार्यालयासमोर, हिंगणा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी नोकराचे नाव आहे. संजय बडवाईक यांच्या हिंगणा आऊटर रिंग रोडलगतच्या शेतात ढाबा असून, तो प्रवीण सातपुते यांनी चालवायला घेतला होता. निखिल त्या ढाब्यावर स्वयंपाक व धुणीभांडी आदी कामे करायचा. या कामात प्रवीण यांना त्यांचा धाकटा भाऊ मनोज हादेखील मदत करायचा.
शुक्रवारी रात्री सर्व कामे आटोपल्यानंतर प्रवीण यांनी मनोजला घरी जाण्याची सूचना केली. तो घरी निघून गेल्यानंतर ढाब्यावर प्रवीण व निखिल दोघेच होते. मध्यरात्रीच्या सुमारास दोघेही एका टेबलवर दारू पीत बसले होते. दारू पिताना त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद उद्भवला. त्यामुळे प्रवीण यांनी निखिलला शिवीगाळ केली. रागाच्या भरात निखिलने जवळच पडला असलेला लोखंडी रॉड उचलला आणि प्रवीणच्या डोक्यावर वार केले.
प्रवीण गतप्राण झाल्याचे लक्षात येताच निखिलने तिथून पळ काढला. प्रवीण मात्र रात्रभर तिथेच पडून होते. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आणि मृतदेह हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. याप्रकरणी हिंगणा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.गुन्ह्याची कबुलीसंजय बडवाईक शनिवारी सकाळी शेतात गेले असता, त्यांना प्रवीण सातपुते रक्तबंबाळ व मृतावस्थेत पडले असल्याचे दिसले. त्यांनी लगेच पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी तपासकार्यात श्वानपथकाचीही मदत घेतली. त्यातच आरोपी निखिलला नागपूर शहरातील रविनगर परिसरातून सकाळी ११ वाजताच्या सुमारास ताब्यात घेत अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, प्रवीण नेहमी शिवीगाळ करीत असल्याने त्यांची हत्या केल्याचेही निखिलने पोलिसांना सांगितले.