लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वैद्यकीय पदव्युत्तर पदवी या अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेस पात्र असलेले विद्यार्थी जे रुग्णांना सेवा देण्यास इच्छुक नसतील अशा विद्यार्थ्यांना वसतिगृह खाली करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण विभागाने सर्व अधिष्ठात्यांना दिले आहेत. त्यानुसार नागपूर मेडिकलमधील ८५ टक्के विद्यार्थी सेवा देण्यास इच्छुक आहेत, परंतु जे इच्छुक नाहीत त्यांना या ‘लॉकडाऊन’च्या दरम्यान वसतिगृहाबाहेर काढू नका, अशी भूमिका मार्ड मेडिकलने घेतली आहे.
‘कोविड-१९’च्या पार्श्वभूमीवर राज्यातील पदव्युत्तर पदवी (पदविका/एमडी/एमएस) अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा उशिरा घेण्यात येणार असल्याच्या सूचना ‘मेडिकल कौन्सिल आॅफ इंडिया’ने (एमसीआय) दिल्या आहेत. शिवाय, पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे २०२०-२१ पासूनचे नवीन वर्गही उशिरा सुरू होणार आहेत. या अनुषंगाने वैद्यकीय शिक्षण विभागाने २८ एप्रिल रोजी ‘व्हिडिओ कॉन्फरन्स’द्वारे मेडिकलच्या सर्व अधिष्ठात्यांची बैठक घेऊन हे निर्देश दिले. त्यावरून मेडिकल प्रशासनाने सर्व विभागप्रमुखांसाठी एक पत्र काढले. यात ज्या विद्यार्थ्यांचे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे ‘टेन्यूर’ पूर्ण झाले आहे, त्यांच्याकडून संबंधित विभागात पुढे काम करण्याबाबत लेखी लिहून घेण्यास सांगितले आहे. पुढे काम करण्यास इच्छुक असलेल्यांना नियमाप्रमाणे विद्यावेतन देण्यात येणार असल्याचे व जेवढे दिवस सेवा देतील तेवढे दिवस बंधपत्रित सेवा म्हणून ग्राह्य धरण्यात यावे. परंतु जे विद्यार्थी सेवा देण्यास इच्छुक नसतील, अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सत्र संपल्यानंतर वसतिगृह रिकामे करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात. यामुळे ‘कोविड-१९’साठी काम करण्यास इच्छुक असतील त्यांच्यासाठी निवासाची व्यवस्था करणे शक्य होईल, असे पत्रात नमूद आहे. या पत्राला घेऊन अंतिम वर्षाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांमध्ये चर्चेला पेव फुटले आहे. रुग्णसेवा देताना अभ्यास करणे कठीण असल्याचे काहींचे म्हणणे आहे. तर ‘लॉक डाऊन’ सुरू असताना वसतिगृहातून बाहेर काढल्यास घरी जाणार कसे, हा प्रश्न उपस्थित केला आहे.
वसतिगृहातून काढणे योग्य नाही - डॉ. देशपांडे
या संदर्भात मेडिकल ‘मार्ड’चे अध्यक्ष डॉ. मुकुल देशपांडे म्हणाले, ‘पीजी’ अंतिम वर्षाच्या अभ्यासक्रमाचे मेडिकलमध्ये साधारण १२० डॉक्टर आहेत. यातील सुमारे ८५ डॉक्टर सेवा देण्यास इच्छुक आहेत. उर्वरित १५ टक्के डॉक्टर आजार, वैयक्तिक समस्या, घरची समस्या व इतर कारणे देऊन सेवेस नकार देत आहे. परंतु ‘लॉकडाऊन’च्या स्थितीत त्यांना वसतिगृहातून काढणे योग्य नाही. याबाबत मेडिकल प्रशासनाशी चर्चा सुरू आहे.