शाहनवाज आलम
नागपूर : रेशन दुकानातील भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी शासनाने धान्य वितरणासाठी बायाेमेट्रिक पद्धत अवलंबली आहे. मात्र एनआयसीचे सर्व्हर डाऊन राहत असल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागताे आहे. काेराेना संक्रमणापासून वाचण्यासाठी गर्दीपासून दूर राहण्याचे सांगण्यात येते; पण रेशन दुकानातील गर्दीमध्ये लाेकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. लाेकांना राेज चकरा माराव्या लागतात, दुकानचालकांशी भांडणही हाेते; पण दिवसभर मनस्ताप सहन करूनही धान्य मिळत नाही.
जानेवारीचा शेवटचा दिवस असल्याने रेशनचे धान्य घेण्यासाठी लाेकांच्या रांगा लागल्या आहेत. महिनाभरापासून लाभार्थ्यांना धान्य न मिळाल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागताे आहे. हे ग्राहक दिवसभर दुकानासमाेर उभे राहून सर्व्हर येण्याची वाट पाहत असतात आणि सायंकाळी दुकान बंद झाले की रिकाम्या हातांनी घरी परततात. यामुळे ग्राहकांचा वेळ आणि पैसा वाया जात असून राेजीरोटीही गमावली जात आहे. माहितीनुसार सर्व्हर मागील अनेक दिवसांपासून डाऊन आहे. त्यामुळे ग्राहकांना रेशन मिळाले नाही. रविवारी सुट्टी असतानाही रेशन दुकानांसमाेर लाेकांची गर्दी हाेती; पण सायंकाळपर्यंत त्यांना धान्य मिळालेच नाही.
राेज हाेते भांडणाची स्थिती
शहरात धान्य वितरणावरून ग्राहक व दुकानदारांमध्ये सतत भांडणाची स्थिती उद्भवते. एका दुकानात धान्य आहे, तर दुसऱ्या दुकानात नाही. ज्या दुकानात धान्य आहे तिथे सर्व्हर बंद आहे. अनेक दुकानांमध्ये या महिन्याचे धान्य पाेहोचलेच नाही. यामुळे फेब्रुवारीचे धान्य कधी वितरित करणार हा प्रश्न आहे. रेशन दुकानदारांनी विभागीय अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केल्याचे सांगितले. मात्र अधिकारी केवळ पत्रव्यवहार करून जबाबदारी झटकत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
एका ग्राहकामागे एक तास
सर्व्हर डाऊन राहत असल्याने धान्य घेताना एका ग्राहकामागे एक-दाेन तास लागतात. ग्राहकांच्या मते धान्य आणायला गेले की कधी धान्य मिळत नाही किंवा कधी सर्व्हर डाऊन असताे. प्रतीक्षा करण्यात पूर्ण दिवस वाया जाताे. राेज दुकानात जाऊन धान्य मिळेल की नाही, असे विचारावे लागते. नुसता मनस्ताप झाला आहे.
शहरातील स्थिती
रेशन दुकानांची संख्या - ६८३
प्रत्येक दुकानात कार्डधारक - ६०० ते १०००
अंत्याेदय कुटुंबांची संख्या - ४४,७३३
प्राधान्य सुचीतील कुटुंब - ३,३७,१७१
महिनाभरापासून हीच समस्या
महिन्याभरापासून सर्व्हर डाऊन आहे. धान्य वितरित करताना त्रास सहन करावा लागताे. केंद्राकडून आधीच धान्य उशिरा येत हाेते. यावेळी काही दिवसांपूर्वीच केंद्राकडून धान्य मिळाले. मात्र आता सर्व्हरची समस्या त्रासदायक ठरली आहे. याबाबत अनेकदा पत्रव्यवहार केला. मात्र विभागीय अधिकाऱ्यांकडून याबाबत समाधान झाले नाही. त्यामुळे ग्राहकांसह दुकानदारांनाही मनस्ताप सहन करावा लागताे आहे.
- गुड्डू अग्रवाल, अध्यक्ष, राशन दुकानदार संघ, नागपूर