लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाआयटी अंतर्गत बुधवारी कर निर्धारण अधिकारी व लेखापाल पदासाठी घेण्यात आलेल्या आॅनलाईन परीक्षेत परीक्षार्थ्यांना (उमेदवारांना) सर्व्हर डाऊनचा फटका बसला. परीक्षार्थ्यांनी गोंधळ घातल्यामुळे वाडी येथील स्कील्स मॅट्रिक सर्व्हिस केंद्रावरील परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता २१ सप्टेंबर रोजी या केंद्रावर फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे.महाआयटी अंतर्गत राज्यात एकाच वेळी आॅनलाईन पद्धतीने कर निर्धारण अधिकारी व लेखापाल या पदासाठी आॅनलाईन पद्धतीने परीक्षा बुधवारी घेण्यात आली. त्यानुसार वाडी येथील स्कील्स मॅट्रिक सर्व्हिस या केंद्रावर तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा वेळेवर सुरु होऊ शकली. त्यामुळे ८१० विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित राहावे लागले.केंद्रप्रमुख म्हणून गोंदियाचे मुख्याधिकारी चंदन पाटील यांच्या मार्गदर्शनात १५ पर्यवेक्षक परीक्षेची जबाबदारी सांभाळत होते. यावेळी संतप्त विद्यार्थ्यांनी केंद्र संचालक आणि प्रशानाविरुद्ध रोष व्यक्त करीत गोंधळ घातला. कर निर्धारण अधिकारी व लेखापाल या पदासाठी उपरोक्त परीक्षा केंद्रावर यवतमाळ, कोल्हापूर, बुलडाणा, अमरावती,चंद्रपूर,भंडारा,नागपूर तसेच महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यातून विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी आले होते. त्यानुसार पहिली बॅच सकाळी ९ ला सुरू होऊन ११ ला संपणार होती परंतु तांत्रिकदृष्ट्या लॅबमध्ये तसेच सर्व्हरमध्ये बिघाड येत असल्याने पहिली बॅच दुपारी १२.१५ वाजता सुटली. सीपीयू हँग होत असल्याने लॉगीन करताना अनेक समस्या निर्माण झाल्या म्हणून परीक्षार्थ्यांत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती आवाक्याबाहेर जाईल अशी स्थिती निर्माण झाल्यावर वाडीचे ठाणेदार नरेश पवार आपल्या सहकाऱ्यांसह केंद्रावर पोहचून परिस्थिती नियंत्रणात आणली.नागपूर ग्रामीणचे तहसीलदार मोहन टिकले यांना माहिती मिळताच परीक्षा केंद्रावर संबंधित केंद्र प्रमुखाशी व परीक्षार्थीं सोबत चर्चा करून त्यांची समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणली. परीक्षार्थींच्या मागणीनुसार आजची सर्व परीक्षा रद्द करून नवीन केंद्रावर येत्या २१ सप्टेंबरला फेरपरीक्षा घेण्यात येईल. त्यासंबंधीची माहिती विद्यार्थ्यांना मेलवर देण्यात येईल असे आश्वासन तहसीलदार यांनी दिल्यावर विद्यार्थी शांत झाले.या केंद्राचे प्रोजेक्ट मॅनेजर दिनेश पाटील यांनी परिस्थतीचे गांभीर्य लक्षात न घेता शासकीय अधिकाऱ्यांशी मोबाईलवर वाद घातला. तर संबंधित केंद्रावर काही विशिष्ट विद्यार्थ्यांना पासवर्ड दिला जात होता असाही आरोप परीक्षार्थींनी केला. उष्णतेमुळे व तांत्रिक अडचणीमुळे हा प्रकार घडला असताना काही परीक्षार्थींनी गोंधळ घातला, असे केंद्रातील पर्यवेक्षकांनी सांगितले.
सर्व्हर डाऊन, परीक्षा रद्द : नागपूरनजीक वाडीत परीक्षा केंद्रावर गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 9:37 PM
महाआयटी अंतर्गत बुधवारी कर निर्धारण अधिकारी व लेखापाल पदासाठी घेण्यात आलेल्या आॅनलाईन परीक्षेत परीक्षार्थ्यांना (उमेदवारांना) सर्व्हर डाऊनचा फटका बसला. परीक्षार्थ्यांनी गोंधळ घातल्यामुळे वाडी येथील स्कील्स मॅट्रिक सर्व्हिस केंद्रावरील परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता २१ सप्टेंबर रोजी या केंद्रावर फेरपरीक्षा घेण्यात येणार आहे.
ठळक मुद्देकर निर्धारण अधिकारी व लेखापाल पदभरती