आयटीआय प्रवेश प्रक्रिया : विद्यार्थी त्रस्त लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) च्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी सर्व्हर डाऊन असल्याने विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. मंगळवारी सकाळी शहरातील विद्यार्थ्यांबरोबरच ग्रामीण भागातून विद्यार्थी आयटीआयमध्ये पोहचले. दुपारी १२.३० ते २ सर्व्हर डाऊन असल्यामुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी बराच वेळ वाट बघावी लागली. भरतवाडा येथून आलेल्या विद्यार्थी म्हणाला, सकाळी ११ वाजता आयटीआयमध्ये पोहचलो. येथे दोन खिडक्यांपुढे रांगा लागल्या होत्या. एका खिडकीत आॅफलाईन अर्जाची तपासणी होत होती तर दुसऱ्या खिडकीमध्ये आॅनलाईन अर्जाची तपासणी होत होती. हे सुरू असतानाच दुपारी १२.३० वाजता सर्व्हर डाऊन झाले. त्यामुळे आॅनलाईन प्रक्रिया ठप्प पडली. शेवटी दुपारी २ वाजता सर्व्हर ठीक झाले. यासंदर्भात लोकमतच्या प्रतिनिधीने येथे उपस्थित कर्मचाऱ्याला विचारणा केली असता, तो अपेक्षित उत्तर देऊ शकला नाही. त्यानंतर प्राचार्य व उपप्राचार्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, ते कार्यालयात उपस्थित नव्हते. येथे उपस्थित असलेले एक अधिकारी म्हणाले की आज प्रवेश प्रक्रियेचा पहिला दिवस आहे. ही प्रक्रिया देशभरात आॅनलाईन सुरू आहे. त्यामुळे सर्व्हर डाऊन होऊ शकतो. सर्व्हर डाऊन झाल्याची माहिती आम्ही मुख्यालयाला दिली आहे.
पहिल्याच दिवशी सर्व्हर डाऊन
By admin | Published: June 21, 2017 2:12 AM