कमल शर्मा नागपूरनागपूर शहरातील वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएलला एकामागोमाग एक झटके लागत आहे. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शहरात अंधार झाल्याने उद्भवलेली परिस्थिती सांभाळण्यासाठी महावितरणने एसएनडीएलकडून सिव्हील लाईन्स डिव्हीजनचे हस्तांतरण केल्यानंतर (स्टेप इन) आपले पाय मजबूत करणे सुरू केले आहे. महावितरणने एसएनडीएलला शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत सिव्हील लाईन्समधील आपल्या कर्मचाऱ्यांना हटविण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच येथे काम करण्यासाठी लागणारा खर्च एसएनडीएलकडून सर्व्हिस चार्जच्या स्वरूपात वसूल केला जाईल. एसएनडीएलने सुद्धा या घटनाक्रमाला दुजोरा दिला असून परिस्थिती लवकरच पूर्ववत होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. गेल्या मंगळवारी एसएनडीएलचे तांत्रिक कर्मचारी संपावर गेले होते. बुधवारी रात्री संप मागे घेण्यात आला. परंतु तोपर्यंत शहरातील वीज पुरवठा व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली होती. सर्वाधिक प्रभावित सिव्हील लाईन्स डिव्हीजनमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महावितरणने या विभागाला आपल्या ताब्यात घेत काम सांभाळले. (या प्रक्रियेला तांत्रिक भाषेत ‘स्टेप इन’ असे म्हटले जाते.) यासोबत एसएनडीएलकडे आता महाल आणि गांधीबाग हे दोनच डिव्हीजन राहिले आहे. परिस्थिती पूर्वपदावर आल्यास सिव्हील लाईन्स सुद्धा एसएनडीएलकडे पुन्हा सोपविले जाईल, अशी चर्चा होती. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महावितरणचे प्रबंध संचालक ओ.पी. गुप्ता यांनी सुद्धा स्टेप इन ही अस्थायी व्यवस्था असल्याचे सांगितले होते. परंतु सध्याची घडामोड वेगळेच संकेत देत आहे. सूत्रानुसार महावितरण आणि एसएनडीएल यांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत असे ठरले की, सिव्हील लाईन्स डिव्हीजनमध्ये आता शासकीय कंपनीच काम करेल. रात्री १२ वाजता एसएनडीएलचे कर्मचारी हटले. येथील कर्मचारी आता इतर झोनमध्ये काम करतील. परंतु एसएनडीएलने मात्र कुठल्याही कर्मचाऱ्याला हटविण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचप्रकारे महावितरणने स्पष्ट केले आहे की, त्यांचे अधिकारी व कर्मचारी जेव्हापर्यंत सिव्हील लाईन्स डिव्हीजनमध्ये काम करतील, तेव्हापर्यंत ते एसएनडीएलकडून सर्व्हिस चार्ज घेतील. याअंतर्गत वेतनापासून तर सर्व खर्च एसएनडीएलला उचलावा लागेल. दरम्यान एसएनडीएलच्या कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा आहे की, आर्थिक खर्च वाढल्यामुळे कंपनी उर्वरित दोन्ही डिव्हीजनसुद्धा सोडू शकते. एसएनडीएलने मात्र या चर्चा केवळ अफवा असल्याचे म्हटले आहे.
‘स्टेप इन’चा सर्व्हिस चार्ज
By admin | Published: May 09, 2015 2:19 AM