नागपूर : डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील नाते विश्वासाचे असून, या श्रद्धेला तडा जाऊ नये. डॉक्टरांनी पैसे कमविणे यात गैर काहीच नाही. असे करीत असताना त्यांनी सामाजिक भान जपत समाजातील गरीब रुग्णांनादेखील मदत केली पाहिजे, असे मत राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले.‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्डस्-२०२०’चे सोमवारी नागपुरात थाटात वितरण झाले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ‘मेडिसीन’ आणि ‘हेल्थकेअर’ क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणारे डॉक्टर्स आणि मान्यवरांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘हॉटेल सेंटर पॉर्इंट’ येथे झालेल्या समारंभाला वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे माजी महासंचालक व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वैज्ञानिक डॉ. रघुनाथ माशेलकर आणि पुणे येथील संचेती हॉस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष व मुख्य आॅर्थोपेडिक सर्जन डॉ. के.एच. संचेती, ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ महाराष्टÑचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे, ‘एसबीएस बायोटेक’, चंदीगडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव जुनेजा उपस्थित होते. व्यासपीठावर ‘लोकमत’च्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा, पुरस्कार निर्णायक मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस. एन. देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते.डॉक्टरांना अनेक पुरस्कार मिळतात. परंतु गरिबांच्या सेवेतून मिळणारी आत्मिक शांती हा सर्वात मोठा पुरस्कार असतो. डॉक्टरांनी ग्रामीण भागाचीदेखील चिंता केली पाहिजे. नागपूरच्या ऐतिहासिक आणि क्रांतिकारी भूमीतून डॉक्टरांनी संकल्प घ्यावा व गरजूंना मदतीचा हात देण्यासाठी पुढाकार घेत एक नवा इतिहास रचावा, असेही राज्यपाल म्हणाले.दर्डा हे खरोखर ‘विजयस्तंभ’च- यावेळी राज्यपालांनी विजय दर्डा यांच्याबाबत कौतुकोद्गार काढले. विजय दर्डा माझ्यासोबत राज्यसभेत होते. त्यांनी सर्वच क्षेत्रात जीवाभावाची माणसे जोडली आहेत. त्यांचा करिष्मा सगळीकडेच दिसून येतो. अगदी दिल्लीच्या महाराष्ट्र सदनातदेखील ‘लोकमत’च दिसून येतो.- खरोखर दर्डा हे ‘विजयस्तंभ’च आहेत. त्यांच्याशी माझे जिव्हाळ्याचे संबंध असून, त्यांचा शब्द माझ्यासाठी जणू आदेशच असतो. त्यांच्या पुढाकारातून सुरू झालेले ‘लोकमत टाइम्स एक्सलन्स इन हेल्थकेअर अवॉर्डस्’ नवा इतिहास रचतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.सरकारी इस्पितळांची योग्य देखभाल व्हावी : दर्डायावेळी विजय दर्डा यांनी पुरस्कारांमागची भूमिका मांडली. मध्य भारतातील ‘मेडिकल हब’ म्हणून नागपूरची ओळख निर्माण झाली आहे. शहराला हे स्थान मिळवून देण्यात येथील डॉक्टरांचा मोलाचा वाटा आहे व त्यांचा सन्मान व्हायलाच पाहिजे, या भावनेतून पुरस्कारांची कल्पना समोर आली. सरकारी इस्पितळांची अवस्था वाईट असून, सार्वजनिक बांधकाम खात्याकडून हे काम काढून इतर संस्थेला दिले पाहिजे. यासाठी राज्यपालांनी सरकारला निर्देश द्यावे, असेही दर्डा म्हणाले.
गरिबांची सेवा हेच डॉक्टरांचे समाधान- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 1:47 AM