लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पैशाच्या वादातून एकाचवेळी पाच जणांचा निर्घृण खून करणारा क्रूरकर्मा विवेक गुलाब पालटकर (३४) याच्याविरुद्ध सत्र न्यायालयाने सोमवारी खून व इतर संबंधित दोषारोप निश्चित केले.मयतांमध्ये कमलाकर मोतीराम पवनकर (४८), त्यांच्या पत्नी अर्चना (४५),आई मीराबाई (७३), मुलगी वेदांती (१२) व भाचा कृष्णा (५) यांचा समावेश आहे. कृष्णा हा आरोपीचा मुलगा होता. पवनकर कुटुंब दिघोरीतील आराधनानगर येथे रहात होते. कमलाकर प्रॉपर्टी डिलर होते. तसेच, ते घरीच वैष्णवी इलेक्ट्रिकल्स नावाने दुकान चालवत होते. आरोपी विवेकला पत्नीच्या खुनात जन्मठेपेची शिक्षा झाली होती. त्याला न्यायालयातून सोडविण्यासाठी कमलाकर यांचे सुमारे पाच लाख रुपये खर्च झाले होते. त्यामुळे कमलाकर आरोपीला पैसे मागत होते. आरोपी हा त्याच्याकडे नवरगाव येथे वडिलोपार्जित दहा एकर शेती असतानाही पैसे परत करत नव्हता. त्यावरून दोघांमध्ये आठ दिवसांपासून वाद सुरू होता. त्यातून आरोपीने हे जघण्य कृत्य केले. घटनेच्या वेळी आरोपीची मुलगी वैष्णवी (७) व कमलाकर यांची मुलगी मिताली (९) या दोघीही घरात होत्या. त्या दोघी सुदैवाने बचावल्या.