नागपूर : पाचपावलीमधील गुन्हेविश्वात वर्चस्व सिद्ध करण्यासाठी एका जुन्या शत्रूची हत्या करणाऱ्या तीन आरोपींना सोमवारी जन्मठेप व पाच हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावास, अशी कमाल शिक्षा सुनावण्यात आली. सत्र न्यायालयाचे न्या. जी. पी. देशमुख यांनी हा निर्णय दिला.
शिक्षा झालेल्या आरोपींमध्ये रजत भगवानदास पाली (२५), अनिकेत ऊर्फ अन्नी महेंद्र मेश्राम (२९) व राहुल ऊर्फ काल्या अनुप खरे (२४) यांचा समावेश आहे. ते सर्व लष्करीबाग येथील रहिवासी आहेत. त्यांना हत्यार कायद्यांतर्गत तीन महिने कारावास व एक हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १० दिवस अतिरिक्त कारावास, अशी शिक्षाही सुनावण्यात आली आहे. हे आरोपी १३ जानेवारी २०१७ पासून कारागृहात आहेत. चौथा आरोपी सतीश नामदेव कुंभारे (३१) याला ठोस पुराव्यांअभावी निर्दोष सोडण्यात आले.
मृताचे नाव गौरव हेमराज दरवाडे (२४) होते. ही घटना ५ जानेवारी २०१७ रोजी दुपारी २ च्या सुमारास कमाल चौक परिसरात घडली. त्यावेळी दरवाडे त्याचे मित्र लक्की कांबळे, समय शेंडे व मंजित संधू यांच्यासोबत कमाल चौक परिसरात होता. दरम्यान, आरोपींनी त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला. त्यामुळे दरवाडे गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मरण पावला. त्याचे मित्र थोडक्यात बचावले. पोलीस उपनिरीक्षक एम. एम. मोकासे यांनी प्रकरणाचा तपास केला.
आईचा जबाब विश्वसनीय ठरला
न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. रश्मी खापर्डे यांनी कामकाज पाहिले. त्यांनी आरोपींविरुद्ध २० साक्षीदार तपासले. दरम्यान, फिर्यादी रोहित वानखेडे याच्यासह इतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितूर झाले. परंतु, मृताच्या आईचा जबाब विश्वसनीय ठरविण्यात आला. तसेच, सीसीटीव्ही फुटेजही महत्वाचा पुरावा ठरले.
खटल्यादरम्यान तीन आरोपींचा मृत्यू
हा खटला न्यायालयात प्रलंबित असताना तीन आरोपींचा मृत्यू झाला. त्यापैकी अखिल ऊर्फ काल्या सिंधीपाल मोटघरे याने फाशी लावून आत्महत्या केली. गौरव ऊर्फ पांड्या अशोक पिल्लेवार याची हत्या करण्यात आली तर, भगवान भय्यालाल पाली हा हृदयरोगाच्या धक्क्यामुळे मरण पावला.