लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची आवश्यकता आहे. विशेषतः लहान मुलांसाठी नागपूर महानगरपालिकेने २०० खाटांचे रुग्णालय सज्ज ठेवावे, अशी सूचना विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. मंगळवारी त्यांनी नागपूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली व परिस्थितीचा आढावा घेतला.
यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., भाजपचे शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके प्रामुख्याने उपस्थित होते. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता विचारात घेता काय उपाययोजना केल्या आहेत आणि आणखी काय करता येईल, याबाबत सविस्तर चर्चा झाली. लहान मुलांसाठी रुग्णालय उभारताना विविध वयोगट विचारात घेण्यात यावेत. अगदी लहान बालके असल्यास त्यांच्या पालकांची व्यवस्थासुद्धा करावी लागेल. प्रत्येक वयोगटाच्या विविध गरजा लक्षात घेऊन याची रचना करावी लागेल. यासाठी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या वतीने सहकार्य करण्यात येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.
यावेळी म्युकरमायकोसिसच्या स्थितीचासुद्धा त्यांनी आढावा घेतला. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचे स्क्रीनिंग लवकर व्हावे, म्हणजे वेळेत उपचार करून त्या रुग्णाला लवकर दिलासा मिळेल, अशी सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केली.