आयएएस, आयपीएस व आयएफएससाठी राठोड यांचे मार्गदर्शन : लोकमत कॅम्पस क्लब व एग्रारियन अकॅडमीचे आयोजन लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आयएएस, आयपीएस व आयएफएसचे ध्येय ठरविणाऱ्या विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी लोकमत कॅम्पस क्लब व एग्रारियन अकॅडमीच्या संयुक्त विद्यमाने नि:शुल्क सेमिनारचे आयोजन शुक्रवारी सिव्हिल लाईन येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात करण्यात आले होते. यात एग्रारियनचे संचालक सुधाकर राठोड विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, ध्येय ठरवा, त्या आधारावर अभ्यासाचे नियोजन करा, कसून मेहनत घ्या आणि यश मिळवा. राठोड यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेची भीती काढण्यासाठी अनेक उदाहरणे दिली. ते म्हणाले की कुणाच्या सांगण्यावर परीक्षेची तयारी करणे, अर्ध्यात सोडून देणे यातून यश मिळत नाही. त्यासाठी दृढनिश्चय करणे गरजेचे आहे. आयएएस, आयपीएस व आयएफएससाठी स्वत:ला त्या स्तरावर सक्षम बनविण्याची इच्छा मनात असणे आवश्यक आहे. या स्पर्धा परीक्षेसंदर्भात विद्यार्थी व पालकांना संबोधित करताना म्हणाले की युपीएससी ही परीक्षा नाही, तर शासकीय सेवेमध्ये रिक्त पदांच्या भर्तीसाठी परीक्षा आयोजित करणारी संस्था आहे. ते म्हणाले की या तीन परीक्षा व्यतिरिक्त अन्य २१ पदांच्या परीक्षेला सुद्धा प्रशासकीय सेवेच्या परीक्षा म्हणण्यात येते. ही परीक्षा दोन टप्प्यात होते. प्राथमिक परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात (मेन्स) परीक्षा होते. मेन्समध्ये लेखी परीक्षा व मुलाखत घेण्यात येते. त्यांनी परीक्षेचे विषय व त्यातील गुणांच्या संदर्भातही माहिती दिली. ते म्हणाले की पाचवी ते बारावी व पदवी प्राप्त करणारे विद्यार्थी कशा प्रकारे परीक्षेची तयारी करीत आहे. या सेमिनारमध्ये आयएएस, आयपीएस व आयएफएस या केंद्र सरकारच्या नोकऱ्या का कराव्यात, देशाची सरकारी रचना काय आहे, आयएएस, आयपीएस , आयएफएस बनून केंद्र सरकारमध्ये कुठे काम करायचे आहे, आदी प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली. कार्यक्रमाचे संचालन पुनम तिवारी महात्मे यांनी केले.
ध्येय ठरवा, नियोजन करा, परिश्रम घ्या व यश मिळवा
By admin | Published: May 14, 2017 2:17 AM