नागपूर : केंद्रीय प्रदूषण नियंत्रक महामंडळाच्या सर्वेक्षणानुसार राज्यात मुंबई, पुणेपाठोपाठ नागपूर शहरातील हवेची गुणवत्ता ढासळली असून, गुणवत्ता सुधारण्याबरोबरच रोजचे निरीक्षण नोंदविण्यासाठी शहरात तीन हवा गुणवत्ता नियंत्रण केंद्रे उभारण्यात आली आहेत.
केंद्र सरकारचा हवा गुणवत्ता सुधार कार्यक्रम अर्थात एन-कॅप योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात ६४.०६ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असून, त्या निधीतून यंत्रणा उभारण्यात आली आहे. महालातील टाऊन हॉल, व्हीएनआयटी आणि एलआयटीजवळ असे तीन ठिकाणी हवा गुणवत्ता नियंत्रण केंद्र उभारण्यात आले आहेत. देशभरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र सरकारकडून स्थानिक स्वराज्य संस्थांना निधी देण्यात आला आहे. नागपूर महापालिका हद्दीतील हवेची गुणवत्ता ढासळल्याचे सर्वेक्षण नोंदविण्यात आल्याने हवा गुणवत्ता सुधार कार्यक्रमासाठी हा निधी देण्यात आला आहे. या निधीतून हवा गुणवत्ता नियंत्रणाबरोबरच रोजचे निरीक्षण नोंदविण्यासाठी तीन ठिकाणी हवा गुणवत्ता नियंत्रण केंद्र उभारण्यात आले आहेत.
- घाटांवरही प्रदूषण नियंत्रण युनिट
केंद्रीय प्रदूषण नियंत्रक मंडळाच्या निरीक्षणाखाली केंद्रे कार्यरत करण्यात आली आहेत. केंद्र उभारणीसाठी महापालिकेने इन्फ्रास्ट्रक्चर पुरविले आहे. हवा गुणवत्ता सुधार कार्यक्रमांतर्गत दोन यांत्रिकी झाडू खरेदी केले आहेत. परंतु, त्याचा अद्याप वापरच सुरू झालेला नाही. हवा गुणवत्ता सुधारण्याचा भाग म्हणून लाकडावरील शवदहनाला पर्याय म्हणून विद्युतदाहिनी हा पर्याय आहे. हवा गुणवत्ता सुधार कार्यक्रमांतर्गत जयताळा, चिंचभवन, फ्रेंड्स कॉलनी येथील स्मशानभूमीमध्ये बर्निंग शेड उभारण्यात आले आहे. याशिवाय गंगाबाई घाट, मोक्षधाम, मानकापूर येथे हवा प्रदूषण नियंत्रण युनिट लावण्यात आले आहे.
दुभाजकांमध्ये शोष वनस्पती
हवेतील नायट्रोजन, सल्फरडाय ऑक्साईड, असे सस्पेंडेड पार्टिकल मॅटर असे विषारी घटक शोषून घेणाऱ्या वनस्पती रस्ता दुभाजकांमध्ये लावल्या जात आहेत. त्याचबरोबर एकीकृत सिग्नल प्रणाली, सुलभ शौचालयांवर सोलर रुफ टॉप बसविणे आदी कामे केली जाणार आहेत.