स्वयंसेवी संस्थेचा पुढाकार : महापौरांनी घेतली दखलनागपूर : प्रशासन जर गंभीर असेल, जनता सर्तक असेल, तर समस्येचा निपटारा सहज शक्य आहे. प्रशासन गंभीर नसल्याने, जनता कितीही सतर्क झाली तरी समस्या मार्गी लागत नाही. फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात पार पडलेल्या पुस्तक मेळाव्यात जनता आणि प्रशासनात एका स्वयंसेवी संस्थेने सेतूची भूमिका बजावली. महापौरांनी त्याची दखल घेऊन, जनतेच्या समस्यांचा निपटारा करून दिला. पुस्तक मेळाव्यात नागपूर महापालिकेला काही स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले होते. महापालिकेने पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने शहरातील ग्रीन व्हिजिल या पर्यावरणविषयक काम करणाऱ्या संस्थेला एक स्टॉल उपलब्ध करून दिला. संस्थेने आपले २५ व्हॉलेंटियर या कामाला लावले. यातून महापालिकेच्या पर्यावरण विषयीच्या संकल्पना जनतेला पटवून देण्यात आल्या. ऊर्जा बचतीसाठी महापालिकेने केलेला प्रयत्न, तलाव संवर्धनात आम आदमीचा सहभाग, स्वच्छता अभियान, नाग नदी, पिवळ्या नदीचे संवर्धन यासंदर्भात या संस्थेच्या व्हॉलेंटियरनी मेळाव्यात जोरदार जनजागृती केली.त्यांच्या या कार्याचे ६४४ लोकांनी कौतुक केले आणि सूचनाही केल्या. परंतु काही लोकांनी पर्यावरणविषयीच्या लेखी तक्रारी या स्टॉलवर केल्या. यात नालेसफाई, सांडपाण्याचे नियोजन, स्ट्रीट लाईट, अनाधिकृत पार्किंग, वृक्षारोपण अशा ६३ तक्रारी संस्थेकडे आल्या. संस्थेने या संपूर्ण तक्रारींचा तपशील महापौर प्रवीण दटके यांना दिला. महापौरांनी लगेच सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन, लेखी तक्रारीची वैयक्तिक दखल घेऊन, सोडविण्याचे आदेश दिले. १० दिवसात यातील बहुतांश तक्रारी प्रशासनाने सहज सोडविल्या. लोकांचे फिडबॅकही संस्थेकडे आले. प्रशासन आणि जनतेमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न संस्थेतर्फे झाल्याने महापौरांनी त्यांना नागपूर महोत्सवातही संधी दिली. (प्रतिनिधी)
जनता आणि प्रशासनात बांधला सेतू
By admin | Published: March 02, 2016 3:23 AM