१० गाई जखमी : बेसूर-केसलापूर मार्गावरील घटनानांद : अनियंत्रित ट्रक रोडच्या कडेने जात असलेल्या गाईच्या कळपात शिरला. त्यात सात गार्इंचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर १० गाई गंभीर जखमी झाल्या. ही घटना उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेसूर-केसलापूर मार्गावरील नागोबा मंदिर परिसरात शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. ही घटना नरकचतुर्दशच्या दिवशी घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. विकास किसना नेव्हारे (३०, रा. बेसूर, ता. भिवापूर) नामक गुराखी बेसूर (ता. भिवापूर) येथील अंदाजे १५० गाई मुचेपार परिसरातील जंगलात नेहमीप्रमाणे चारावयास घेऊन जात होता. या गार्इंचा कळप रोज बेसूर-नाळपाटीमार्गे मुचेपारच्या जंगलात जातो. हा कळप नाळपाटीनजीकच्या नागोबा मंदिराच्या वळणावर पोहोचताच उमरेडहून हिंगणघाटकडे (जिल्हा) भरधाव जाणाऱ्या एमएच-३१/सीबी-००५६ क्रमांकाच्या ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने गार्इंच्या कळपात शिरला. त्यामुळे काही गाई ट्रकच्या चाकाखाली आल्या तर काही रोडच्या कडेला फेकल्या गेल्या. यात ७ गार्इंचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर १० गार्इंना गंभीर दुखापत झाली. ठार झालेल्या गाई बेसूर येथील मनोहर धोटे, शैलेश अगवान, संजय उईके, युवराज अगवान, सुधाकर भुळे, मयूर मेंडूले यांच्या मालकीच्या असून, रामकृष्ण दाहाघाने, पत्रू धोटे, गंगाधर नारनवरे, रामभाऊ शिंगाडे, मयूर मेंडूले, सखाराम चाचेरकर, प्रभाकर दाभेकर, सचिन अंड्रसकर, अशोक सेलोटे यांच्या गाई जखमी झाल्या. यात अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती नागरिकांनी दिली. अपघात होताच ट्रकचालक ट्रक सोडून पळून गेला. या रोडवरून जणाऱ्या काहींनी सदर अपघाताची माहिती बेसूर येथील नागरिक तसेच उमरेड पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहोचपर्यंत नागरिकांनी गर्दी केली होती. या प्रकरणी उमरेड पोलिसांनी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला. (वार्ताहर)उताराचा मार्गउमरेड हिंगणघाट मार्गावरील नाळपाटी वळणापासून (बेसूरच्या दिशेने) हा मार्ग उताराचा आहे. बहुतांश वाहनचालक त्यांची वाहने इंधन वाचविण्यासाठी या वाहनावर ‘न्यूट्रल’ करतात. ही वाहने न्यूट्रलमध्ये बेसूरपर्यंत नेली जातात. शिवाय, या वळण मार्गाच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात झाडे -झुडपे असल्याने समोरून येणारे वाहन सहसा वाहनचालकांना दिसत नाही. गुराखी गाई घेऊन जंगलाकडे जात असताना याच वळणावर हा अपघात झाला. सणाला गालबोटग्रामीण भागात दिवाळीच्या दिवशी (लक्ष्मीपूजन व बलिप्रतिपदा) गार्इंची पूजा केली जाते. एवढेच नव्हे तर, बलिप्रतिपदेच्या दिवशी गार्इंना आकर्षक सजवून त्यांची गावातून वाजत - गाजत तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत मिरवणूक काढली जाते. त्यातच या अपघातात बेसूर येथील सहा गाई ठार झाल्याने दिवाळीच्या उत्सवाला गालबोट लागले. हा ट्रक गिट्टी घेऊन जात होता. ट्रक कळपात शिरताच गुराखी जीव वाचविण्यासाठी शेजारच्या शेतात पळाला.
भरधाव ट्रकने सात गाई चिरडल्या
By admin | Published: October 30, 2016 2:48 AM