लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने ४७ हजार रुपये चोरीचा खटला सात दिवसात निकाली काढून आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास व ४५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिन्यांचा अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश बी. डी. तारे यांनी हा निर्णय दिला. ही घटना सीताबर्डी पोलिसांच्या हद्दीतील आहे.बजरंग ऊर्फ विजय सत्यवार चवरे (३८) असे आरोपीचे नाव असून तो साईनगर, दाभा येथील रहिवासी आहे. आरोपीने खामला येथील फिर्यादी विशाल सेवकराम नोतवाणी यांच्या दुकानात चोरी केली होती. नोतवाणी यांचे सीताबर्डीत मोबाईल दुरुस्ती व साहित्याचे दुकान आहे. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी त्यांनी दुकानात ४७ हजार रुपये ठेवून भाऊ सागर याला त्याकडे लक्ष ठेवण्यास सांगितले होते. काही वेळाने दुकानात परत आल्यानंतर त्यांना ४७ हजार रुपये दिसून आले नाही. सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर आरोपीने ही रक्कम चोरल्याचे स्पष्ट झाले.सीताबर्डी पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून एफआयआर नोंदवून २० नोव्हेंबर रोजी आरोपीला अटक केली. तसेच, २१ नोव्हेंबर रोजी आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. त्यानंतर न्यायालयाने ७ दिवस सुनावणी घेऊन खटला निकाली काढला. ठाणेदार हेमंतकुमार खराबे, तपास अधिकारी के. आर. चौधरी, पैरवी अधिकारी हरीभाऊ बांते आदींनी या प्रकरणात महत्वाचे योगदान दिले. न्यायालयात सरकारतर्फे अॅड. राजेश श्यामसुंदर यांनी बाजू मांडली.
नागपुरात चोरीच्या खटल्याचा सात दिवसात निकाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2018 12:09 AM
प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी न्यायालयाने ४७ हजार रुपये चोरीचा खटला सात दिवसात निकाली काढून आरोपीला तीन वर्षे सश्रम कारावास व ४५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिन्यांचा अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्यायाधीश बी. डी. तारे यांनी हा निर्णय दिला. ही घटना सीताबर्डी पोलिसांच्या हद्दीतील आहे.
ठळक मुद्देजेएमएफसी न्यायालय : आरोपीला तीन वर्षांचा कारावास