नागपूर : डेंग्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी घराघरांची विशेष सर्वेक्षण मोहीम सुरू होऊन एक महिना झाला आहे. परंतु त्यानंतरही दूषित घरांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. धक्कादायक म्हणजे, मागील १४ दिवसात ९३ डेंग्यू रुग्णांची नोंद झाली. दर दिवसाला जवळपास सात रुग्ण आढळून येत आहेत. जानेवारी ते १४ ऑगस्ट यादरम्यान ४१८ रुग्णांची नोंद झाली असून, तीन रुग्णांचा जीव गेला आहे.
डेंग्यूच्या साथीने चांगलेच थैमान घातले आहे. डेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा अॅण्टीबायोटिक किंवा अॅण्टीव्हायरल औषध नाही. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो. २०१२ पासून नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात डेंग्यू आढळून येत असतानाही शासनासोबत नागरिकही याला थांबविण्यासाठी पुढाकार घेत नसल्याचे वास्तव आहे. रुग्ण वाढल्यावरच उपाययोजना केल्या जात असल्याने, दरवर्षी रुग्णात वाढ होत आहे. विशेष म्हणजे, सर्वेक्षणात दूषित घरांवर कारवाई होत नाही. यामुळे सर्वेक्षणाला कुणी गंभीरतेने घेत नसल्याचेही चित्र आहे.
- जूनमध्ये ८६, जुलै महिन्यात २५१ रुग्ण
डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत चालल्याने चिंता वाढली आहे. जून महिन्यात डेंग्यूचे ८६, जुलै महिन्यात तब्बल २५१ तर मागील १४ दिवसात ९३ रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांमध्ये लहान मुलांची संख्या मोठी आहे. यामुळे लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन हिवताप व हत्तीरोग विभागाचा दीपाली नासरे यांनी केले आहे.
- ३७० घरे दूषित
प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत शहरात मनपाद्वारे झोननिहाय सर्वेक्षणात मंगळवारी ८,४४६ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यापैकी ३७० घरे दूषित आढळली, म्हणजेच या घरांमध्ये डेंग्यू अळी आढळून आली. मनपाच्या सर्वेक्षणात दूषित घरांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे सर्वेक्षणावरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.