लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बारावीच्या निकालात यंदा प्राविण्यश्रेणीत उत्तीर्ण झालेल्या नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा आकडा कल्पनेपलीकडे वाढला आहे. विभागीय मंडळाच्या आकडेवारीनुसार यंदा नागपूर विभागात थोडेथोडके नव्हे तर ६५ हजार ७६५ विद्यार्थी प्राविण्यश्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. २०१९ मध्ये हाच आकडा ११ हजार ३५२ इतका होता. मागील वर्षीच्या तुलनेत प्राविण्यश्रेणीतील विद्यार्थ्यांमध्ये सात पटींनी वाढ झाली आहे. एकूण विद्यार्थ्यांचा विचार केला तर ४६.६९ टक्के विद्यार्थी प्राविण्यश्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
नागपूर विभागात एकूण १ लाख ४० हजार ८५९ पैकी १ लाख ४० हजार ३२५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. एकूण परीक्षार्थ्यांपैकी ६३ हजार ७६५ विद्यार्थी प्रथम श्रेणीत आले आहेत. यांची टक्केवारी ४५.३६ टक्के इतकी आहे. तर द्वितीय श्रेणीत १० हजार ५५० म्हणजेच ७.४९ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.