नागपूर : सध्या सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दिवस चांगले नाहीत. गेल्या महिनाभरात घडलेल्या घटना हेच सांगताहेत. गुन्हेगार आणि नेतेही कायदा हातात घेऊन सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांवर हल्ले करीत आहेत. मागील महिन्यात घडलेल्या अशा सात घटनांपैकी पाच घटना तर पोलिसांशी संबंधित आहेत.
या महिन्यातील सर्वात गाजलेले प्रकरण सदर पोलीस ठाण्याचे होते. २ नोव्हेंबरला एनएचएआयचे क्षेत्रीय अधिकारी राजीव अग्रवाल यांच्या चेहऱ्यावर भाजपा नगरसेवक पार्षद प्रदीप पोहाणे यांनी पारडी फ्लायओव्हर पुलाच्या विषयावरून सहकाऱ्यांसह काळे फासले होते. पोलिसांनी या सर्वांवर गुन्हे दाखल करून अटक केली होती.
दुसऱ्या प्रकरणात नगरसेवक रघुवीर मेश्राम यांचा मुलगा असलेल्या धीरज या कुख्यात गुन्हेगाराला झोन पाचचे डीसीपी नीलोत्पल यांनी दोन वर्षासाठी तडीपार केले. तरीही तो कामठी परिसरात फिरत होता. ११ नोव्हेंबरला तो आपल्या घरी आल्याची माहिती पोलिसांना कळताच त्याला पकडले. परंतु नगरसेवक रघुवीर मेश्राम यांनी कुटुंबीयांसह पोलिसांवर हल्ला केला. अखेर पोलिसांनी रघुवीर आणि त्यांच्या मुलाला अटक केली.
तिसरे प्रकरण कोराडीतील आहे. या घटनेत रेती माफियाच्या ट्रकचालकाने तलाठ्याला ट्रकखाली चिरडण्याचा प्रयत्न केला होता. घाटावरून चोरलेली रेती कामठीच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी जप्त केली होती. १३ नोव्हेंबरला एम.एच.३१/ए.पी./१५२९ चा ट्रकचालक महेंद्र वाहने याला खसाला येथील तलाठी पद्माकर अगम यांनी रंगेहात पकडले होते. या घटनेत त्यांना ट्रकखाली चिरडण्याचा प्रयत्न चालकाने केला होता.
चौथी घटना पारडीत घडली. ट्रकचालक आणि क्लीनर एका मुलाला चोर समजून मारहाण करीत होते. कळमना पोलिसांच्या पथकाने त्या मुलाला सोडविण्याचा प्रयत्न केला. मात्र संतापलेल्या शमशेर सिंह रंधावा (२४ आणि मनदीपसिंह सिद्धू यांनी पोलिसांवरच हल्ला करून चार पोलिसांना जखमी केले. पाचवी घटना १८ नोव्हेंबरला कामठीत घडली. कामठी नगर परिषदेचे कर्मचारी कामठी पोलीस ठाण्यातील शिपाई सुरेंद्र शेंद्रे यांच्यासह मास्क संदर्भात कारवाई करीत असताना स्कॉर्पिओचालकाने सुरेंद्र यांना मारहाण केली.
सहाव्या घटनेत सीताबर्डीतील महाजन मार्केटजवळ बिट्टू सावड़िया या युवकाने कारला धडक मारली. संतप्त नागरिकांनी त्याला ठोकून काढले. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून त्याला सोडविले. यामुळे नाराज झालेल्या एका गारमेंट दुकानदाराने पोलीस शिपायालाच मारहाण केली.
सातवी घटना २९ नोव्हेंबरच्या रात्री सक्करदरा चौकात घडली. कुख्यात शेखू गँगचा आकाश चव्हाण याने वाहतूक हवालदार अमोल चिंदमवार यांना चिरडण्याचा प्रयत्न केला. मात्र अमोल यांनी कारच्या बोनेटवर बसून जीव वाचविला.