लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्राच्या कोट्यातून एमबीबीएसची अॅडमिशन करून देतो, अशी थाप मारून पालकांकडून लाखो रुपये उकळणऱ्या टोळीविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सौरभ श्रीवास्तव (वय ३८, रा. सेक्टर ५०, गुडगाव, हरियाणा), सचिन उत्तलकर (वय ३०, रा. खारघर, सेक्टर २१, नवी मुंबई), शंकर मानवटकर (वय ३०, रा. रिलायन्स फ्र्रेशजवळ, अथर्वनगर, बेसा), उल्हास सेवारे (वय ३०) तसेच प्रमोद आणि प्रभाकर अशी या टोळीतील आरोपींची नावे आहेत.पोस्टर, पॉम्प्लेट छापून एमबीबीएसच्या अॅडमिशनचा दावा आरोपी करीत होते. एका मित्राच्या माध्यमातून शेख मकसूद जुम्मामिया (वय ४४, रा. झिमल कॉलनी, वलगाव रोड, अमरावती) यांनी आरोपींशी एप्रिल २०१७ ला संपर्क केला. यावेळी आरोपींनी मकसूद यांच्या मुलीला एमबीबीएसमध्ये अॅडमिशन करून देतो, अशी बतावणी केली. त्यांना नागपूरच्या झांशी राणी चौकातील शांतिभवन हॉटेलमध्ये बोलवून आरोपींनी बैठक घेतली. त्याबदल्यात मकसूद यांच्याकडून १० लाख रुपये घेतले. त्यानंतर मकसूद यांच्या मुलीच्या नावाने सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाल्याचे प्रवेशपत्र दिले. त्यावर राजमुद्रा अंकित असून, आरोग्य मंत्री जी. पी. नड्डा यांची बनावट स्वाक्षरी आहे. हे पत्र घेऊन शेख मकसूद मुलीच्या प्रवेशासाठी सोलापूरला गेले असता ते प्रवेशपत्र बनावट असल्याचे आणि आरोपींनी फसवणूक केल्याचे उघड झाले. परिणामी मकसूद यांनी आपली रक्कम परत मिळावी म्हणून आरोपींमागे तगादा लावला. पोलिसात जाण्याचा धाकही दाखवला. त्यामुळे आॅक्टोबरमध्ये आरोपींनी त्यांना तीन लाख रुपये परत केले. वारंवार मागणी करूनही सात लाख मात्र दिले नाही. इकडे आरोपींनी त्यांचे सीताबर्डी परिसरातील कार्यालयही बंद केले.गुन्हा दाखल, आरोपी फरारआपली रक्कम परत देणार नाही, हे ध्यानात आल्याने मकसूद यांनी धंतोली पोलीस ठाण्यात जानेवारी २०१८ मध्ये धाव घेतली. पोलिसांनी आपल्या क्षेत्रात हे येत नसल्याचे सांगून टाळले. त्यानंतर त्यांनी सीताबर्डी ठाण्यात तक्रार दिली. ठाणेदार हेमंत खराबे यांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. वृत्ता लिहिस्तोवर कुणालाही अटक झालेली नव्हती. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके वेगवेगळळ्या शहरात जाणार आहेत.
एमबीबीएसच्या अॅडमिशनचे आमिष दाखवून सात लाखांचा गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 1:28 AM
केंद्राच्या कोट्यातून एमबीबीएसची अॅडमिशन करून देतो, अशी थाप मारून पालकांकडून लाखो रुपये उकळणऱ्या टोळीविरुद्ध सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
ठळक मुद्देमंत्र्याच्या बनावट सहीचे प्रवेशपत्र : अमरावतीच्या कंत्राटदाराची तक्रार