ग्रेट बँकयार्ड बर्ड काऊंट : विदर्भातून उत्स्फूर्त प्रतिसाद नागपूर : जागतिक पातळीवर अलीकडेच १७ ते २० फेब्रुवारी दरम्यान घेण्यात आलेल्या ग्रेट बँकयार्ड बर्ड काऊंट या पक्षी गणनेत एकूण ७५० प्रजातींच्या सात लाख पक्ष्यांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, यात भारतातील तब्बल ११०० पेक्षा अधिक पक्षीनिरीक्षकांनी आपला सहभाग नोंदविला होता. पक्षी निरीक्षण हा आनंददायी छंद असला तरी त्याला दुसरी बाजू ही शास्त्रीय ज्ञानाची आहे. त्यामुळेच या कार्यक्रमातून गोळा होणारी माहिती ही पक्ष्यांबद्दलच्या अनेक अनुत्तरित प्रश्नांची उकल करते. देशभरातून जवळपास २८ राज्यांमधील पक्षीनिरीक्षकांनी या पक्षी गणनेत भाग घेतला होता. त्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील पक्षीनिरीक्षकांचा समावेश होता. याचेच फलित म्हणजे संपूर्ण देशात महाराष्ट्रातून सर्वात जास्त प्रजाती नोंदविल्या गेल्या आहेत. यामध्ये मुंबई, पुणे, प. घाट व विदभार्तून मोठ्या प्रमाणात पक्षीनिरीक्षकांचा सहभाग व पक्षी प्रजाती नोंदणी झाली. कॅम्पस बर्ड काऊंट अंतर्गत देशात एकूण २९३ ठिकाणांची नोंद झाली असून, त्यामध्ये महाराष्ट्रातून ४४ कॅम्पसची नोंद करून बाजी मारली आहे. यामध्ये विदर्भातील १४ ठिकाणांचा समावेश आहे. विदर्भातून यावर्षी केवळ गडचिरोली आणि गोंदिया वगळता इतर नऊ जिल्ह्यांमधून या पक्षी गणनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये सर्वात जास्त सहभाग हा अमरावती जिल्ह्यातून राहिला आहे. येथील २० पक्षीनिरीक्षकांसह २०० विद्यार्थी व निसर्ग प्रेमींनी भाग घेऊन १९० प्रजातींची नोंद केली. अमरावती जिल्ह्यातील वडाळी बांबू गार्डन, अमरावती विद्यापीठ, शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था, शिवाजी विज्ञान महाविद्यालय, तसेच काही अभियांत्रिकी महाविद्यालयात व परतवाडा येथे विद्यार्थ्यांसमवेत पक्षी नोंदणी करण्यात आली. तसेच नागपूर येथील राजभवन जैवविविधता पार्क व हिस्लॉप कॉलेज येथे कॅम्पस बर्ड काऊंट घेण्यात आला. विदर्भातून सर्वात जास्त २०५ पक्षी प्रजाती अकोला येथून नोंदविण्यात आल्या. यामधील सहभागी पक्षीनिरीक्षकांनी आपल्या सर्व नोंदी संकेतस्थळावर टाकल्या आहेत. त्या माहितीतून पक्ष्यांविषयी महत्त्वपूर्ण माहिती पुढे येणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे समन्वयक तथा अमरावतीचे मानद वन्यजीव रक्षक डॉ. जयंत वडतकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. विदर्भातील विविध ठिकाणांहून मिळालेल्या उत्स्फूर्त सहभागामध्ये यादव तरटे, वेक्स संस्थेचे विशाल गवळी, सौरभ जवंजाळ, मनीष ढाकुलकर, अल्केश ठाकरे, डॉ. मिनाक्षी राजपूत, गौरव कडू, ऋतुजा कुकडे, शिशिर शेंडोकर, मंगेश तायडे, रवी धोंगडे, मिलिंद सावदेकर, स्वप्निल वानखडे, विजय खंडागडे, नरेंद्र लोहबरे, दिलीप विरखडे, जयंत अत्रे व धर्मेंद्र तेलगोटे यांनी भाग घेतला होता.(प्रतिनिधी) विज्ञानावर आधारित माहिती पक्ष्यांच्या कोणत्या प्रजाती भारतात कुठे आणि किती संख्येत आढळतात, कोणत्या प्रजातीची संख्या कमी होत आहे किंवा वाढत आहे? त्यांच्या अधिवासात काही बदल वा हस्तक्षेप होत आहेत का किंवा यामध्ये दरवर्षी काय बदल होत आहेत अशी उपयुक्त माहिती लोक विज्ञानावर आधारित ग्रेट बँकयार्ड बर्ड काऊंटमधून मिळणार आहे. शिवाय आपल्या परिसरात असलेल्या पक्षी अधिवासास असलेल्या धोक्यांची माहिती मिळत असते, त्यातून पक्ष्यांचे संवर्धनाकडे लक्ष देता येईल व पक्षी वाचविण्यासाठी एक फळी तयार होत राहील अशी अपेक्षा या कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. जयंत वडतकर यांनी व्यक्त केली.
सात लाख पक्ष्यांची नोंद
By admin | Published: February 25, 2017 2:03 AM