लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जरीपटक्यातील एका घरातून सात लाखांची रोकड आणि दागिने चोरीला गेले. गुरुवारी रात्री ७.३० ते ९ च्या दरम्यान ही धाडसी चोरीची घटना घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.इंदोरा बाराखोली परिसरातील संकल्प बौद्ध विहाराजवळ राणी सूरज देशकर (वय ३१) यांचे घर आहे. त्या खासगी रुग्णालयात पारिचारिका असून, त्यांचे पती सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात. राणी आजूबाजूच्या परिसरातील महिलांची बीसी चालविते. दर दिवाळीला बीसीची सोडत काढली जाते. दिवाळी तोंडावर असल्याने त्यांनी बीसीची रक्कम जमवणे सुरू केले होते. सात लाखांची रोकड त्यांच्याकडे गोळा झाली होती. ती त्यांनी घरातील कपाटात ठेवली. तेथेच त्यांचे दागिने होते. गुरुवारी रात्री ७.३० ते ९ या वेळेत राणी आणि सूरज हे दाम्पत्य घरीच होते. या वेळेत घरात शिरलेल्या चोरट्याने बेमालूमपणे सात लाखांची रोकड तसेच दागिने चोरून नेले. रात्री ९.१५ च्या सुमारास त्यांनी कपाट उघडले असता त्यांना त्यात रक्कम आणि दागिने दिसले नाही. चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. शेजाºयांकडे चोरीची माहिती दिल्यानंतर जरीपटका पोलिसांना कळविले. पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी देशकर दाम्पत्याकडून माहिती घेतल्यानंतर चोरट्याचा शोध घेण्यासाठी परिसरात बरीच शोधाशोध केली. मध्यरात्रीपर्यंत अनेकांकडे चौकशी केली. आज सकाळपासून पुन्हा पोलिसांनी अनेकांकडे विचारपूस केली. मात्र, पोलिसांना चोरट्याबाबत माहिती मिळाली नाही.
संपर्कातील व्यक्तीचे कृत्य?विशेष म्हणजे, ज्या भागात ही धाडसी चोरी झाली त्या परिसरात अत्यंत दाटीवाटीने घर आहेत. अशा ठिकाणी चोरटा शिरला कसा आणि त्याने एवढी मोठी रोकड तसेच दागिने लांबविले कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीस त्या प्रश्नाचे उत्तर शोधत आहे. देशकर यांच्याकडे मोठी रक्कम असल्याचे माहीत असणाºयाने अर्थात संपर्कातीलच व्यक्तीने ही चोरी केली असावी, असा कयास आहे. त्यासंबंधाने पोलिसांनी काही संशयितांकडे विचारपूस चालविली आहे.