लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सालेकसा(जि. गोंदिया)तील एका सराफा दुकानातून चोरण्यात आलेल्या दागिन्यांपैकी सात लाखांचे दागिने एसटी बसमध्ये बेवारस अवस्थेत आढळले. विशेष म्हणजे, एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराची तक्रार देण्यासाठी तत्परता दाखविली नाही. पोलिसांना त्याची कुणकुण लागताच एसटीच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा खुलासा झाला.पोलिसांच्या माहितीनुसार, सालेकसा येथील राधे ज्वेलर्सचे संचालक अरविंद क्षीरसागर यांनी ८ आॅक्टोबरला सकाळी दुकान उघडले. साफसफाई करताना दागिन्यांची बॅग काऊंटरवर ठेवली. यावेळी दोन आरोपींनी संधी साधून दागिन्यांची ही बॅग लंपास केली. याप्रकरणी सालेकसा पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, लाखोंच्या दागिन्यांची बॅग एसटी (एमएच १४/ बीटी ५०१८)मध्ये बेवारस अवस्थेत अधिकाºयांना सापडल्याची कुणकुण गणेशपेठ पोलिसांना लागली. ही बस गोंदियाहून दुपारी नागपुरात आल्यानंतर बसवाहकाने ती दागिन्याची बॅग अधिकाऱ्यांच्या हवाली केल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे गणेशपेठ पोलिसांनी लगेच एसटी अधिकाऱ्यांना विचारपूस केली. प्रारंभी संबंधित अधिकाऱ्यांनी दाद दिली नाही. त्यामुळे गणेशपेठच्या पोलिसांनी आपल्या पद्धतीने चौकशी सुरू केली. पोलिसांच्या हालचाली लक्षात आल्यानंतर एसटीच्या अधिकाऱ्यांनी रात्री ८ च्या सुमारास पोलिसांना दागिन्याची बॅग सोपविली. या बॅगमध्ये ४ लाख ९६ हजारांचे सोन्याचे तर २ लाख ३५ हजारांचे चांदीचे दागिने आढळले. पोलिसांनी ते ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी गोंदिया जिल्हा पोलीस प्रशासनाशी संपर्क साधला. दरम्यान, चोरट्याने तब्बल सात लाखांचे दागिने एसटीत बेवारस कसे सोडले, हा प्रश्न चर्चेचा विषय ठरला आहे.एसटी अधिकाऱ्यांनी का केला विलंब?यासंबंधाने गणेशपेठचे ठाणेदार सुनील गांगुर्डे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना बुधवारी दुपारीच दागिने मिळाल्याचे सांगितले. त्यांनी पंचनामा करून ती बॅग तशीच ठेवून घेतली. पोलिसांना त्यांनी तात्काळ माहिती द्यायला पाहिजे होती. मात्र, तसे झाले नाही. एसटीच्या अधिकाऱ्यांनी दागिन्यांची तात्काळ माहिती देण्याची तसदी का घेतली नाही, ते कळायला मार्ग नसल्याचे ते म्हणाले. दरम्यान, प्रकरणाची माहिती कळाल्यानंतर पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर यांनीही गणेशपेठ ठाण्यात येऊन माहिती जाणून घेतली. त्यानंतर आवश्यक ते दिशानिर्देश दिले. या प्रकरणाच्या संबंधाने उलटसुलट चर्चा सुरू आहे.
नागपुरात एसटी बसमध्ये आढळली सात लाखांच्या दागिन्यांची बॅग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 12:41 AM
सालेकसा(जि. गोंदिया)तील एका सराफा दुकानातून चोरण्यात आलेल्या दागिन्यांपैकी सात लाखांचे दागिने एसटी बसमध्ये बेवारस अवस्थेत आढळले. विशेष म्हणजे, एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकाराची तक्रार देण्यासाठी तत्परता दाखविली नाही. पोलिसांना त्याची कुणकुण लागताच एसटीच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा खुलासा झाला.
ठळक मुद्देएसटी अधिकाऱ्यांची भूमिकेची चौकशी