लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व क्रीडामंत्री सुनील केदार यांच्या हस्ते शनिवारी सात रुग्णवाहिकेंचे लोकार्पण करून त्या हस्तांतरित करण्यात आल्या. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी ४९ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. त्यात आणखी सात रुग्णवाहिकेची भर पडली आहे.
जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात, हिवरा बाजार (रामटेक), मोहपा (कळमेश्वर), खापा (सावनेर), भुगावमेंढा (-कामठी), धानला (मौदा), भिष्णूर (नरखेड), तसेच सालई गोधनी (नागपूर) अशा एकूण सात प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. तसेच पंचायत राज बळकट करण्यासाठी हिंगणा, कळमेश्वर, काटोल, भिवापूर आणि रामटेक या पंचायत समितीच्या सभापतींना केदार यांच्या हस्ते बोलेरो वाहन सुपुर्द करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे, उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, विषय समिती सभापती भारती पाटील, नेमावली माटे, तापेश्वर वैद्य, उज्ज्वला बोढारे यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर, आरोग्य विभागाच्या जिल्हा विस्तार माध्यम अधिकारी सुरेखा चौबे यावेळी उपस्थित होते.