नागपूर : ‘ज्याचे माकड ताेच नाचवेल’, ही म्हण काही चुकीची नाही. राज्यातील उपेक्षित राहिलेल्या अभयारण्याबाबत तरी तसेच म्हणावे लागेल. व्याघ्र प्रकल्प व अभयारण्य विकासाबाबत अग्रणी असलेल्या महाराष्ट्रातील सात अभयारण्य मात्र विकासापासून दुर्लक्षित राहिली आहेत. व्यवस्थापनाची जबाबदारी वनविभागाच्या प्रादेशिक विभागाकडे असल्याकारणाने ते उपेक्षित राहिले आहेत. वन्यजीव विभागाकडे व्यवस्थापन असते तर चित्र काही वेगळे असते, असा ठाम विश्वास वन्यजीव अभ्यासकांना वाटताे.
महाराष्ट्रात ६ व्याघ्र प्रकल्प व ५० वन्यजीव अभयारण्य अस्तित्वात आहेत. यातील बहुतेक अभयारण्याचे व्यवस्थापन वन्यजीव विभागाकडे आहे. त्यामुळे ते बऱ्यापैकी विकसित आहेत. मात्र सात अभयारण्य विकासापासून वंचित, दुर्लक्षित व उपेक्षित राहिले आहेत. विशेष म्हणजे त्यांचे नावही अनेकांना माहीत नाही. यामध्ये विदर्भातील यवतमाळचे इसापूर, गडचिराेलीचे प्राणहिता, चंद्रपूरचे घाेडाझरी तसेच ताम्हीणी, सुधागड हे पुण्याचे, काेल्हापूरचे मालवण सागरी अभयारण्य व ठाणे येथील अभयारण्याचा समावेश आहे. यांना अभयारण्याची मान्यता देऊन बरीच वर्षे झाली आहेत, पण त्याप्रमाणे विकास हाेऊ शकला नाही.
राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य यादव तरटे पाटील यांनी जानेवारी २०२१ मध्ये या सातही अभयारण्यांचे व्यवस्थापन वन्यजीव विभागाकडे सुपूर्द करण्याची मागणी तत्कालीन वनमंत्री तसेच मुख्य वन्यजीव संरक्षक यांना निवेदन सादर करून अभयारण्य वन्यजीव विभागाकडे हस्तांतरित करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याची विनंती केली हाेती. त्यांच्या मते, प्रादेशिक विभागाचे प्राधान्य हे वनव्यवस्थापन आणि त्यातून महसूल गाेळा करण्यात जास्त असते. त्यामुळे वन्यजीव अधिवासांचे व्यवस्थापन, त्यांचे संवर्धन व संरक्षण कायम दुर्लक्षित राहिले आहे. हे सातही अभयारण्य कित्येक वर्षांपासून जाहीर हाेऊनही उपेक्षित राहिले आहेत. त्यापेक्षा वन्यजीव विभागाकडे असलेल्या अभयारण्य व व्याघ्र प्रकल्पांचा चांगला विकास झाला आहे व त्यांचे पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्व वाढले आहे. याचा गांभीर्याने विचार करून सात अभयारण्यांचे हस्तांतरण ताबडताेब वन्यजीव विभागाकडे करण्यात यावे, अशी मागणी पाटील यांनी केली.
अभयारण्य प्रादेशिक विभाग प्रस्तावित वन्यजीव विभाग
इसापूर पुसद पांढरकवडा
प्राणहिता सिराेंचा आलापल्ली
घाेडाझरी ब्रह्मपुरी ताडाेबा
मालवण सागरी सावंतवाडी काेल्हापूर
ताम्हिणी पुणे पुणे
सुधागड पुणे पुणे
ठाणे क्रिक फ्लेमिंगाे ठाणे
वन्यजीव विभागाकडे असलेल्या सर्वच अभयारण्याचा चांगला विकास झाला आहे. हे सात अभयारण्य वन्यजीव विभागाकडे हस्तांतरित केल्यास वन्यजीव अधिवासाचे व्यवस्थापन, त्यांचे संवर्धन व संरक्षणाच्या दृष्टीने मदत हाेईल आणि पर्यटन वाढीलाही चालना मिळेल.
- यादव तरटे पाटील, सदस्य, महाराष्ट्र वन्यजीव मंडळ