आशीष रॉय
नागपूर : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने समृद्धी महामार्गावर सात सौर पार्क उभारण्याचा निर्णय घेतला असून त्यापैकी सहा विदर्भात आहेत. या पार्कची क्षमता १३८.५ मेगावॅट असेल व ५४३ एकर क्षेत्रात त्यांचा विस्तार असेल, अशी माहिती संयुक्त व्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली.
पहिल्या टप्प्यात भिलखेडा येथे ५ मेगावॅटच्या सौरपार्कचा विकास करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री सौर कृषी योजना अंतर्गत सौरऊर्जा खरेदीसाठी ‘महावितरण’ने काढलेल्या निविदांमध्ये आम्ही भाग घेतला होता. आम्ही ३.०५ रुपये प्रति युनिटदराने ५ मेगावॅट पुरवठा करण्याची ऑफर दिली. एमएसईडीईएलने आम्हाला स्वीकृती पत्र जारी केले आहे आणि महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडून मंजुरी मागितली आहे. त्यानंतर आम्ही ईपीसी तत्त्वावर पॅनेल उभारण्यासाठी निविदा काढली, अशी माहिती पुलकुंडवार यांनी दिली. एजन्सीने मेहकरजवळील सौरपार्कमधून ४ मेगावॅटची विक्री करण्यासाठी दुसऱ्या निविदेत भाग घेतला होता.
महामंडळ एकूण १२० मेगावॅट क्षमतेच्या सौरपार्कच्या विकासासाठी सौरऊर्जा विकासकांकडून ईओआय आमंत्रित करण्याचा पर्याय शोधत आहे. महामंडळ २७ वर्षांच्या लीजवर जमीन उपलब्ध करून देईल आणि कमीत कमी भाडे आकारेल, असेदेखील त्यांनी सांगितले. महामंडळाने कारंजा लाडजवळील भिलखेडा गावाजवळ ५ मेगावॅट क्षमतेचे सौर पॅनेल बसविण्यासाठी निविदा काढली आहे. १० तारखेपर्यंत यासाठी मुदत देण्यात आली आहे.
इथे उभारणार सौर पार्क
- विरूळ (तालुका आर्वी, जिल्हा वर्धा) - २२.५ मेगावॅट
- आसेगाव (तालुका धामणगाव, जिल्हा अमरावती) - १८ मेगावॅट
- गावेर तळेगाव (तालुका नांदगाव खंडेश्वर, जिल्हा अमरावती) - २४.५ मेगावॅट
- भिलखेडा (तालुका कारंजा लाड, जिल्हा वाशिम) - १६ मेगावॅट
- मालेगावजवळ (जिल्हा वाशिम) - २६ मेगावॅट
- मेहकरजवळ (जिल्हा बुलढाणा) - २१ मेगावॅट
- कोकमठाण ( तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर)- १०.५ मेगावॅट