लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्तनदा माता, गरोदर महिला, मुलांची माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी शासनातर्फे अंगणवाडीसेविकांना मोबाइल देण्यात आले. त्या मोबाइलमध्ये पोषण ट्रॅकर नावाच्या अॅपमध्ये १० प्रकारची माहिती सेविकांना भरावी लागते. ही सर्व माहिती इंग्रजीत भरावी लागत असल्याने सेविकांची अडचण होत आहे. या अॅपला मानधनाशी जोडले जात असल्याने त्यांच्यापुढे संकट निर्माण झाले आहे.
अंगणवाड्यांच्या कामकाजाची माहिती शासनाला दैनंदिन पातळीवर कळविण्यासाठी, मे २०२० पर्यंत कॅस अॅप्समध्ये भरली जात होती. परंतु, मे २०२० पासून कॅसमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यामुळे ते बंद पडले व माहिती पुन्हा रजिस्टरमध्ये भरण्याचे आदेश आले. त्यानंतर काहीच दिवसांत पोषण ट्रॅकर या केंद्र शासनाच्या नवीन अॅपवर काम करण्याचा आदेश आला.
- अंगणवाडी सेविकांना करावी लागणारी कामे
गरोदर महिलांची नोंदणी, स्तनदा माता नोंदणी, ० ते ३ व ३ ते ६ मुलांची नोंदणी, किशोरवयीन मुली, मुलांची नोंदणी, अंगणवाडी सुरू करणे मुलांची उपस्थिती, लसीकरण, वजन घेणे, पोलिओ ड्रॉप, सॅम-मॅमची माहिती, टीएचआरवाटप, पोषण आहारवाटप
- मोबाइलची अडचण
महाराष्ट्रात सर्व शासकीय व्यवहार मराठीत व्हावेत, असा आदेश आहे. त्यानुसार पोषण ट्रॅकरमध्येदेखील सर्व माहिती मराठीत भरली गेली पाहिजे. परंतु, पोषण ट्रॅकर अॅपमध्ये मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध होत नाही. इंग्रजीमध्येच सर्व माहिती भरावी लागते. बहुसंख्य अंगणवाडी कर्मचारी, विशेषत: ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील सेविका, मिनी अंगणवाडीसेविका कमी शिकलेल्या आहेत व त्यांना इंग्रजीमध्ये माहिती भरता येत नाही. अनेक सेविकांचा शासनाने दिलेला मोबाइल नादुरुस्त आहे. त्यात पोषण ट्रॅकर अॅप डाउनलोड होत नाही. त्यामुळे त्यांना आपल्या खाजगी मोबाइलवर अॅप डाउनलोड करायला सांगितले जात आहे. अनेक जणींकडे स्वत:चा चांगला स्मार्ट फोन नाही. काहींकडे असल्यास तो त्या एकट्या वापरत नाहीत. अनेकांच्या पाल्यांचे त्यावर ऑनलाइन वर्ग किंवा परीक्षा चालू असतात. त्यामुळे त्यांना तो हवा तेव्हा उपलब्ध होईलच, याची खात्री देता येत नाही. शिवाय, डेटा रिचार्जचे पैसे महिनोनमहिने येत नाहीत. दुर्गम भागात इंटरनेटच्या अडचणी आहे.
- लाभार्थी बालकांचा आधारकार्ड क्रमांक जोडल्याशिवाय व सर्व माहिती इंग्रजीत भरल्याशिवाय त्यांना पूरक पोषण आहाराचा लाभ मिळू शकणार नाही, अशी जाचक अट पोषण ट्रॅकरमध्ये घालण्यात आलेली आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मानधन पोषण ट्रॅकरला जोडण्यात येणार आहे. अनेकदा प्रयत्न करूनही अॅपमध्ये भरलेली माहिती सिंक होत नाही. कधी रेंज न मिळाल्याने इंटरनेट चालू नसते किंवा त्याची क्षमता कमी असते, त्यामुळे माहिती अपलोड होत नाही, तर कधी सर्व्हर डाउन असतो.
चंदा मेंढे, सचिव, अंगणवाडी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र (सीटू)
- पोषण ट्रॅकर अॅपच्या अनेक अडचणी आहे. आता तो मानधनाशी संलग्न करण्यात येणार आहे. त्याचा परिणाम सेविकांच्या मानधनावर होणार आहे. अनेक सेविका अल्पशिक्षित आहे. अनेकांचे वय झाले आहे. मोबाइल बिघडलेले आहे. अशा अनेक अडचणी आहेत. आम्ही सध्या काम करणे बंद केले आहे. लवकरच आम्ही आंदोलन करणार आहोत.
ज्योती अंडरसहारे, आयटक
- ७५ टक्के अंगणवाडीसेविकांनी कामे केली आहे. २५ टक्के अंगणवाडीसेविकांचा प्रश्न आहे. त्यांनीही प्रयत्न करायला काहीच हरकत नाही. हा निर्णय शासनस्तरावरून झाला आहे. शासनाने तयार केलेले अॅप आहे. त्यानुसार, कामकाज करायचे आहे.
भागवत तांबे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, जि.प.