लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हलबा क्रांती सेनेतर्फे १५ नोव्हेंबरपासून अनिश्चितकालीन उपोषणाला बसलेल्या कमलेश भगतकर यांना पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी सकाळच्या सुमारास बळाचा वापर करून भगतकर यांना उचलून नेल्याचा आरोप करून हलबा सेनेच्या तरुणांनी तीव्र नारेबाजी केली. यामुळे गांधीबाग परिसरात काही काळ तणाव पसरला होता. यादरम्यान भगतकर यांच्या जागी समाजाचे ज्येष्ठ नागरिक विजय मौंदेकर यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. दुसरीकडे भगतकर यांनी रुग्णालयातही आपले आंदोलन सुरुच ठेवले आहे.हलबा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि सोबत वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी हलबा क्रांती सेनेच्यावतीने जगदीश खापेकर यांच्या नेतृत्वात गांधीबाग उद्यान परिसरातील रा.बा. कुंभारे यांच्या पुतळ्याजवळ १५ नोव्हेंबरपासून आंदोलन सुरू करण्यात आले. त्या दिवसापासून कमलेश भगतकर या तरुणाने अनिश्चितकालीन उपोषण सुरू केले होते. त्याच्या समर्थनार्थ क्रांती सेनेतर्फे वेगवेगळे आंदोलनही करण्यात आले. पाचव्या दिवशी भव्य सभा घेण्यात आली. दरम्यान, कमलेश यांनी उपोषण सोडण्यास नकार दिला होता. त्यामुळे पोलिसांनी बुधवारी सातव्या दिवशी सकाळी ८ वाजताच्या सुमारास त्यांना उचलून मेयो रुग्णालयात दाखल केले.कमलेश यांना उचलण्यासाठी ५० च्यावर पोलिसांचा फौजफाटा आला होता. सकाळच्या वेळी येथे जास्त कार्यकर्ते उपस्थित नव्हते. याचा फायदा घेत पोलिसांनी कमलेश यांना जबरदस्तीने उचलून रुग्णालयात नेल्याचा आरोप जगदीश खापेकर यांनी केला. पोलिसांच्या कारवाईची माहिती मिळताच कार्यकर्त्यांनी नारेबाजी केली. बुधवारी ईद उत्सव असल्याने तरुणांना शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले होते व त्यामुळे कार्यकर्ते शांत होऊन परतल्याचे त्यांनी सांगितले.सरकारने हलबा समाजाच्या भावनेचा अनादर केल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा खापेकर यांनी दिला.पोलिसांनी कमलेश भगतकर यांना उचलून रुग्णालयात दाखल केले असले तरी, त्यांनी रुग्णालयातही उपोषण सोडण्यास नकार दिला आहे. सरकारने पोलिसांच्या मदतीने दडपशाही करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न चालविला आहे. मात्र शरीरात शेवटचा श्वास असेपर्यंत मी समाजाच्या न्यायासाठी लढा देणार, असे सांगितले.६० वर्षांचे मौंदेकर उपोषणावरसातव्या दिवशी पोलिसांनी कमलेश यांचे उपोषण थांबविल्यानंतर त्यांच्या जागी ज्येष्ठ नागरिक विजय मौंदेकर यांनी बुधवारपासून उपोषण सुरू केले आहे. संविधानाने हलबा समाजाला दिलेला अधिकार ६०-७० वर्षे होऊनही मिळत नाही. कधी काळी उद्योजक असलेला हा समाज आता विस्कळीत झाला आहे. आम्हाला जातीचे दाखले, जात पडताळणी प्रमाणपत्र मिळत नाही. तरुणांना नोकऱ्या. त्यामुळे आमच्या समाजाला न्याय मिळावा, ही आमची मागणी आहे. वेगळा विदर्भ झाल्याशिवाय आम्हाला न्याय मिळणार नाही, असे मनोगत मौंदेकर यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.