इंटकच्या प्रयत्नांना यश : १ जानेवारी २०१६ नंतर निवृत्त झालेल्यांना लाभ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर महापालिकेतील सेवानिवृत्त कर्मचारी, अधिकारी व शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू करण्याला राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. परंतु सेवानिवृत कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला नव्हता. तो लागू करावा, यासाठी राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशन (इंटक)चा मागील काही महिन्यांपासून मनपा प्रशासन व राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू होता. पालकमंत्री नितीन राऊत यांच्याशी संघटनेच्या शिष्टमंडळाने ९ जून रोजी यासंदर्भात चर्चा केली होती. त्यांनी हा प्रश्न तातडीने सोडविण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार बुधवारी शासनाचे उपसचिव सतीश मोघे यांनी मनपा आयुक्तांना आदेश दिले आहेत.
१ जानेवारी २०१६ ते ७ जुलै २०२० या कालावधीत सेवानिवृत्त झालेल्या मंजूर पदांवरील सेवानिवृत्तांना सुधारित वेतन मिळणार आहे. तसेच १ ऑगस्ट २०१९ नंतर निवृत्त सेवानिवृत्त व मृत कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगासह थकबाकी दिली जाणार आहे.
राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशन (इंटक) चे अध्यक्ष सुरेंद्र टिंगणे, जनरल सेक्रेटरी रंजन नलोडे व कोषाध्यक्ष प्रवीण तंत्रपाळे यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासन निर्णयाचे स्वागत करून हा संघटनेच्या एकजुटीचा विजय असल्याचे म्हटले आहे.