लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नाकाबंदी दरम्यान बुटीबोरी पोलिसांनी एका कारमधून ७० लाख रुपये जप्त केले आहे. बुधवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास नागपूर-चंद्रपूर महामार्गावर ही कारवाई करण्यात आली.महामार्गावरील वाय पॉईंटवर नाकाबंदी करीत पोलीस वाहनांची तपासणी करीत होते. या दरम्यान नागपूरहून चंद्रपूरकडे जाणारी कार क्रमांक एम.एच.३१/सीएस ५००९ ला तपासणीसाठी थांबविण्यात आले. यात पोलिसांना कारच्या मागील सीटवर नोटांनी भरलेली बॅग आढळून आली. ही रक्कम ७० लाख रुपये इतकी आहे. यासंदर्भात गाडीचा चालक अश्विन ढोले आणि गाडीत बसलेले चंद्रपूर येथील चढ्ढा ट्रान्सपोर्टचे व्यवस्थापक दिलीप इंगोले यांना पोलिसांनी या विचारणा केली. मात्र त्यांच्याकडून पोलिसांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे या दोघांविरुद्ध बुटीबोरी पोलीस ठाण्यात भादंविच्या ४१(१)(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. कारमधून जप्त करण्यात आलेल्या रकमेबाबत पोलीस दोघांकडून माहिती घेत आहे. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणाची माहिती आयकर विभागाला कळविली आहे.ही कारवाई बुटीबोरीचे पोलीस निरीक्षक हेमंत चांदेवार यांच्या नेतृत्वात सहायक पोलीस उपनिरीक्षक शशी शेंडे, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत डवरे, पोलीस हवालदार गजेेंद्र चौधरी, शिपाई मनीष नविलकर, अर्जुन मरस्कोल्हे यांनी केली.