Nagpur Train Accident : गेल्या काही महिन्यांपासून देशभरात रेल्वे अपघाताच्या घटना समोर येत आहेत. या रेल्वे अपघातांमध्ये अनेकांना जीव देखील गमवावा लागला आहे. अशातच आता नागपूरातूनही रेल्वे अपघाताची घटना समोर आली आहे. नागपुरात अचानक एक एक्स्प्रेस गाडी रुळावरून घसरली. नागपूरच्या कळमना रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला. मुंबईहून निघालेली शालिमार एक्सप्रेस इतवारी रेल्वे स्थानकावर येताच अचानक रुळावरून घसरल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समोर आलं आहे.
नागपुरातील कळमना रेल्वे स्थानकाजवळ सीएसएमटी शालिमार एक्स्प्रेस (गाडी क्रमांक १८०२९) चे दोन डबे रुळावरून घसरले आहेत. या रेल्वे अपघातात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. कळमना रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या या अपघातामुळे रेल्वे वाहतूक प्रभावित झाली असून, रेल्वे प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे वरिष्ठ डीसीएम दिलीप सिंह यांनी या घटनेची माहिती दिली आहे. "नागपूरमधील कळमना रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे क्रमांक १८०२९ सीएसएमटी शालीमार एक्स्प्रेसचे दोन डबे- एस २ आणि पार्सल व्हॅन रुळावरून घसरली. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. या ट्रेनमधील प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी नेण्यासाठी रेल्वे प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. अपघाताबाबत रेल्वेकडून हेल्पलाइन सुरू करण्यात आली असून प्रवाशांना मूलभूत सुविधा पुरवल्या जात आहेत," दिलीप सिंह यांनी सांगितले.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच कल्याणमध्येही एक लोकल रुळावरुन घसरली होती. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. कल्याण स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर डबा रुळावरून घसरल्याने ही घटना घडली. ट्रेन सीएसएमटीच्या दिशेने जात असताना एक डबा रुळावरून घसरला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.