योगेश पांडे
नागपूर : हिंगणा एमआयडीसीतील सोनेगाव (निपाणी) येथील एका कारखान्यात स्फोट होऊन लागलेल्या भीषण आगीत तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. तर दोन कामगार गंभीर जखमी झाले. या अग्नितांडवामध्ये दोन कामगारांचा अद्यापही शोध लागलेला नाही. त्यामुळे मृत्यूचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आग इतकी भीषण होती की काही किलोमीटर अंतरावरून देखील धुराचे लोट दिसून येत होते.
एमआयडीसीत सोनेगाव (निपाणी) येथे दीक्षांत भरत कटारिया यांचा कटारिया ॲग्रो प्रोडक्ट हा कारखाना आहे. तेथे लाकडी भुसा व गवताच्या काड्यांपासून भट्टीत जाळण्यासाठी उपयोगात येणाऱ्या बायोमास पॅलेट्स तयार करण्यात येतात. सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास कारखान्यात सुपरवायझर व १४ कामगार काम करत होते. अचानक जोरदार स्फोट झाला व आग लागली. तेथील गवत व लाकडी भुशामुळे आग वेगाने पसरली व कामगार आगीतच अडकले. यात हेमराज आर्मो (४२,वाडी), आदेश दहिवले (३३, भीमनगर झोपडपट्टी), अनुरोध मडावी (२०, सोनेगाव निपाणी) यांचा मृत्यू झाला. तर विकास मडावी (२३, सोनेगाव निपाणी), सरीत मडावी (२२, सोनेगाव निपाणी) व धनेंद्र आगासे (३६, साईनगर) हे गंभीर जखमी झाले. आगीची दाहकता इतकी होती की मृतदेहांचा अक्षरशः कोळसा झाला होता. आग आटोक्यात आणण्यासाठी बारा अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीत कारखान्यातील सर्व कच्चा-पक्का माल व यंत्रसामुग्री जळून खाक झाली. आगीचे नेमके कारण कळू शकलेले नाही. बहुतांश कामगार हे बिहार व इतर राज्यांतील आहेत. त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क करण्यात आला आहे.
मृतदेहांची करणार ‘डीएनए’ चाचणी
कामगार जेथे काम करत होते, तो भाग आगीने वेढल्या गेला व काही क्षणातच त्यांचा होरपळून मृत्यू झाला. मृतदेहांचा अक्षरशः कोळसा झाला असून त्यांची ओळख पटविणे देखील अशक्य झाले आहे. सर्व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहेत. ओळख पटविण्यासाठी मृतदेहांची ‘डीएनए’ चाचणी करण्यात येणार आहे.
ओळख पटविण्यासाठी धावाधाव
आगीमध्ये नेमका कुणाचा मृत्यू झाला आहे ही बाब आग लागून अनेक तास झाल्यावर देखील स्पष्ट झाली नव्हती. अखेर बचावलेल्या कामगारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मृतकांची नावे स्पष्ट होऊ शकली. पोलिस उपायुक्त अनुराज जैन,नागपूर ग्रामीणचे तहसीलदार वानखेडे, सहायक पोलिस आयुक्त प्रवीण तेजाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भीमा नरके हे उशिरापर्यंत घटनास्थळी होते.
दरवाजाजवळ असलेले कामगार बचावले
या कारखान्याला सर्व बाजूंनी टिनाचे पत्रे लावून बंद केले आहे. केवळ रस्त्याच्या एकाच दिशेला दोन गेट ठेवण्यात आले आहे. स्फोट झाला ते ठिकाण या गेटपासून बरेच लांब आहे. स्फोट झाल्याबरोबर आग लागली व सर्वत्र धूर पसरला. धुरामुळे काहीच दिसत नव्हते. दरवाजाजवळ असलेले कामगार बाहेर पडल्याने बचावले. मात्र आतल्या भागात असलेल्या कामगारांना मृत्यूने गाठले.