नागपूर : दक्षिण-पश्चिम नागपुरातील कामगारनगर आयटी पार्कचा मागच्या परिसरात गटार लाईन जुनी असल्याने जागोजागी तुंबलेली आहे. गटार लाईनचे चेंबर भरलेले आहे. त्यामुळे लोकांच्या घरातून घाण पाणी सातत्याने वाहत आहे. काही लोकांच्या घरासमोरून तर काहींच्या घरामागच्या बाजूस गटारीचे पाणी तुंबलेले आहे. घाण अगदी दारापर्यंत पोहचली असली तरी या समस्येकडे दुर्लक्ष मात्र कुणाचे नाही.
या घाणीमुळे डासांचा प्रकोप वाढला आहे. गटारीच्या घाण पाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. महापालिकेच्या लक्ष्मीनगर झोनकडे या संदर्भात वारंवार तक्रारीही दिल्या आहेत. परिसरातील काही भागांत गटार लाईनवर लोकांनी बांधकाम केले आहे. त्यामुळे महापालिकेच्या यंत्रणेला स्वच्छतेला अडथळा येत आहे. असे दुर्गंधीचे वातावरण असतानाही येथे राहणाऱ्या काही लोकांचे सहकार्य मिळत नसल्याचे महापालिकेचे म्हणणे आहे. कामगारनगर परिसरात किमान २५ वर्षे जुनी गटार लाईन आहे. ती जीर्ण झाल्यामुळे नव्याने टाकण्यात यावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी मंगेश कामोने यांनी केली आहे.