वर्धा : नुकत्याच एका महत्त्वाच्या निर्णयाद्वारे राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमाच्या फॉरेन्सिक मेडिसिन या विषयात असलेल्या सोडोमी (गुद्द्वारासंबंधीचा संभोग), ओरल सेक्स (मुखमैथुन), यासारख्या लैंगिक क्रियांच्या वर्गीकरणातून अनैसर्गिक शब्द काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
आधीच्या वैद्यकीय अभ्यासक्रमात फक्त योनीद्वारे होणाऱ्या लैंगिक संभोगाला नैसर्गिक आणि इतर लैंगिक क्रिया जसे की गुद्द्वारासंबंधीचा संभोग, मुखमैथून इत्यादींना अनैसर्गिक असे संबोधिले जात होते; परंतु आयोगाने घेतलेल्या निर्णयामुळे आता लैंगिक क्रियांना नैसर्गिक व अनैसर्गिक अश्या गटात वर्गीकरण करता येणार नाही.
वैद्यकीय अभ्यासक्रमातील एल.जी.बी.टी. या समुदायाविषयीच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आयोगाच्या वैद्यकीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष अरुणा वाणिकर यांनी एक तज्ज्ञ समिती स्थापन केली होती. तज्ज्ञ समितीच्या शिफारशींवर हा निर्णय घेतला आहे.
समितीमध्ये डॉ. विजेंद्र कुमार (बालरोग तज्ज्ञ-दिल्ली), डॉ. प्रभा चंद्रा (मानसिक आरोग्य विभाग- बंगळुरू), डॉ. सुरेखा किशोर (डायरेक्टर एम्स- गोरखपूर) व डॉ. इंद्रजीत खांडेकर (सेवाग्राम) यांचा समावेश होता. कुठलीही लैंगिक क्रिया व्यक्तीला व जोडीदाराला अनुकूल असेल तर ती लैंगिक क्रिया हानिकारक किंवा अनैसर्गिक नाही, असे वैद्यकीय दृष्टिकोणातून मानल्या जाते. तरीही दुर्दैवाने, लैंगिक संभोगाव्यतिरिक्त वापरल्या जाणाऱ्या विविध लैंगिक क्रिया या चुकीच्या व अनैसर्गिक आहेत, असे सांगितले जाते.
तज्ज्ञ म्हणतात...
योनीद्वारे होणारा लैंगिक संभोग किंवा इतर कुठल्याही लैंगिक क्रियेमुळे जर व्यक्तीला व जोडीदाराला त्रास होत असेल, किंवा ती क्रिया बळजबरीने, इच्छेविरुद्ध किंवा अल्पवयीन मुला-मुलींसोबत केली जात असेल तरच ती क्रिया हानिकारक, असामान्य व आरोग्यास अपायकारक आहे, असे मानले जाते, तसेच सोडोमी ही पूर्णपणे नैसर्गिक स्थिती आहे आणि ती मानवी लैंगिकतेचा नैसर्गिक आणि सामान्य प्रकार असल्याचे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा नोंदवले आहे. म्हणूनच वैद्यकीय अभ्यासक्रमातून स्वेच्छेने व समंतीने होणाऱ्या विविध लैंगिक क्रियांना अनैसर्गिक वर्गीकरणातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती या समितीचे सदस्य तथा सेवाग्राम येथील फॉरेन्सिक तज्ज्ञ डॉ. इंद्रजीत खांडेकर यांनी दिली.