लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - सामाजिक सुरक्षा पथकाने जरीपटक्यातील एका पॉश कुंटणखान्यावर छापा मारून एका वारांगनेला रंगेहात पकडले. तिच्याकडून वेश्याव्यवसाय करवून घेणारा आरोपी अमित लालवानी (वय ३८) यालाही पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे, या कुंटणखान्यावर बनावट चहापत्ती, गुटखा आणि प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचेही घबाड पोलिसांच्या हाती लागले. रात्री ११ वाजेपर्यंत यासंबंधाने पोलिसांची कारवाई सुरू होती.
जरीपटक्यातील नारा घाटाजवळ एका दुमजली इमारतीत सेक्स रॅकेट चालविले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाला मिळाली. त्यावरून पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने सापळा लावला. अमितसोबत बनावट ग्राहकाच्या माध्यमातून संपर्क करण्यात आला. त्याने देहविक्रय करणारी तरुणी ग्राहकाला उपलब्ध करून दिली. काही वेेळेतच पोलिसांनी तेथे छापा मारला. आरोपी अमित लालवानीला ताब्यात घेऊन पोलिसांनी दोन मजली इमारतीची झडती घेतली असता तेथे बनावट चहापत्ती, गुटख्याची १५ पोती तसेच प्रतिबंधित तंबाखूचा मोठा साठा आढळला. त्यामुळे पीआय सोनवणे यांनी एफडीआयच्या अधिकाऱ्यांना कारवाईसाठी पाचारण केले. रात्री ११ वाजेपर्यंत पोलीस आणि एफडीआयचे अधिकारी या कुंटणखान्यावर कारवाई करीत होते.
अमितच्या रॅकेटमध्ये अनेक बडे मासे
आरोपी अमितकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, त्याने तीन महिन्याच्या करारावर हे दुमजली इमारत भाड्याने घेतली. घरमालक दिल्लीला राहतो. तेथे तो कुंटणखाना चालवायचा आणि बनावट साहित्यही दडवून ठेवायचा. सुगंधित तंबाखू आणि बनावट चहापत्तीसह विविध वस्तू-साहित्याची निर्मिती करून सर्वसामान्य नागरिकांच्या जीविताशी खेळणारे एक मोठे रॅकेट जरीपटक्यात कार्यरत आहे. पोलिसांशी सलगी असणाऱ्या दलालांच्या माध्यमातून हे रॅकेट रोज लाखोंची हेराफेरी करते. पोलिसांनी कसून तपासणी केल्यास समाजकंटकांचे एक मोठे रॅकेट आणि बडे मासे उजेडात येण्याची शक्यता आहे.