नागपूर : बेसा पॉवर हाउस मार्गावरील एका फ्लॅटमध्ये मुलींकडून देहव्यापार करवून घेणारे रॅकेट उघडकीस आले आहे. हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. पोलिसांनी रॅकेटच्या सूत्रधार महिलेला अटक करून विधवा महिला व तरुणीची सुटका केली आहे. अंजली ऊर्फ नूतन (३०) असे अटक आरोपीचे नाव असून, ती चंद्रिका नगर येथील रहिवासी आहे.
ती अनेक दिवसांपासून सेक्स रॅकेट चालवत होती. कागदपत्रावर नूतन असे तिचे नाव आहे. तिरुपती टॉवर, दिघोरी चौक, हुडकेश्वर येथे फ्लॅट भाड्याने घेऊन ती अड्डा चालवत होती. तिला ग्राहक सहज मिळायचे व ती फ्लॅटवर बोलावून त्यांना मुली उपलब्ध करून द्यायची. सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला या रॅकेटची माहिती मिळाली. डमी ग्राहक पाठवून अंजलीशी सौदा केला. पैसे घेताच पोलिसांनी फ्लॅटवर छापा मारून अंजलीला ताब्यात घेतले. एक तरुणी उत्तर प्रदेशमधील आझमगडची आहे तर दुसरी स्थानिक आहे.
आझमगढची तरुणी अनेक दिवसांपासून वेश्याव्यवसायात आहे. स्थानिक महिला पूर्वी कपड्याच्या दुकानात काम करायची. आर्थिक विवंचनेमुळे ती अंजलीच्या जाळ्यात अडकली. ग्राहक अंजलीशी मोबाइलवर संपर्क साधायचे व सौदा झाल्यानंतर ऑनलाइन पैसे भरायचे. पोलिसांपासून बचावासाठी अंजली जुन्या ग्राहकांना किंवा त्यांच्यामार्फत येणाऱ्या लोकांनाच सेवा देत असे. ती ग्राहकाकडून दोन ते तीन हजार रुपये घेत असे व तरुणींना हजार-पाचशे रुपये देत असे. अंजलीविरोधात हुडकेश्वर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक शुभांगी देशमुख, माधुरी नेरकर, संतोष जाधव, अनिल अंबाडे, संजय सोनवणे, रिना जाउरकर, लक्ष्मण चौरे, संदीप चंगोले, अश्विन मांगे, समीर शेख, पूनम शेंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.