लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तृतीयपंथी उत्तम ऊर्फ बाबा सपन सेनापतीने त्याच्यावर नागपूर मध्यवर्ती कारागृहातील पोलीस कर्मचारी व सहकैद्यांनी लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. यासंदर्भात त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
उत्तम सेनापती हा तृतीयपंथी प्रवीण ऊर्फ चमचम प्रकाश गजभिये याच्या खून प्रकरणात मुख्य आरोपी आहे. तो ५ जून २०१९ रोजी अटक झाल्यापासून मध्यवर्ती कारागृहात आहे. ही घटना ४ जून २०१९ रोजी कळमना पोलिसांच्या हद्दीत घडली होती. या प्रकरणाचा खटला सत्र न्यायालयात प्रलंबित आहे. उत्तमसह एकूण पाच तृतीयपंथी आरोपींना पुरुष कैद्यांच्या बराकीत ठेवण्यात आले होते. इतर आरोपींना जामीन मिळाल्यामुळे सध्या उत्तम एकटाच कारागृहात आहे. पोलीस कर्मचारी व सहकैदी रोज लैंगिक अत्याचार करतात, असा गंभीर आरोप उत्तमने केला आहे. पुरुष कैद्यांच्या बराकीतून बाहेर काढून स्वतंत्र बराकीत ठेवण्यासाठी कारागृह प्रशासन व जिल्हा न्यायाधीशांना पत्राद्वारे विनंती केली होती. यासाठी उपोषणही केले होते. परंतु, ही मागणी पूर्ण करण्यात आली नाही. त्यामुळे रोज लैंगिक अत्याचार सहन करावा लागत आहे, असे उत्तमने याचिकेत नमूद केले आहे. या प्रकरणाची कारागृह उपमहानिरीक्षकामार्फत चौकशी करण्यात यावी, चौकशीत दोषी आढळून येणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी व स्वतंत्र बराकीत ठेवण्याचे निर्देश देण्यात यावे, अशी विनंती उत्तमने न्यायालयाला केली आहे.
पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवता येणार
यासंदर्भात तक्रार नोंदवण्यासाठी उत्तमला धंतोली पोलीस ठाण्यात नेण्यात यावे, असे निर्देश उच्च न्यायालयाने मंगळवारी कारागृह अधीक्षकांना दिले. तसेच, कारागृह अधीक्षक व कारागृह उपमहानिरीक्षक यांना नोटीस बजावून ६ मेपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय झेड.ए. हक व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. उत्तमतर्फे ॲड. राजेश नायक यांनी कामकाज पाहिले.