नागपूर : नोकरीचे आमिष दाखवत सीएच्या एका विद्यार्थ्याने एका विवाहित महिलेवर अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. मागील वर्षभरापासून हा प्रकार सुरू होता व आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच विवाहितेने गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे.
आरोपीचे नाव रजत मेघराज राणा (२९) असे आहे. २८ वर्षीय विवाहितेचा पती एका खासगी कंपनीत कामाला आहे. पतीसोबत मतभेद असल्याने संबंधित महिला तिच्या आई-वडिलांसोबत राहते. वर्षभरापूर्वी सोशल मीडियावर तिची राणासोबत ओळख झाली होती. रजत स्वत:ला सीएचा विद्यार्थी म्हणवत होता. कडबी चौकात त्याचे कार्यालय आहे. त्याने विवाहितेला नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले व तिला भेटायला बोलावले.
विवाहितेच्या तक्रारीनुसार राणाने तिच्याशी आक्षेपार्ह गोष्टी केल्या. यामुळे महिला त्याला प्रतिसाद देण्याऐवजी परतली. यानंतर राणाने विवाहितेवर नव्याने इम्प्रेस करण्यास सुरुवात केली. तो विवाहितेला गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. तेथे तिने त्याच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तेव्हापासून राणाला जेव्हा-जेव्हा संधी मिळायची तेव्हा तो विवाहित महिलेला त्याच्याकडे येण्यास भाग पाडायचा.
काही दिवसांपासून राणाची मागणी वाढली होती. त्यामुळे विवाहितेने त्याला भेटणे टाळले. त्यानंतर राणाने विवाहितेला शिवीगाळ करून धमकावण्यास सुरुवात केली. तिचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच विवाहितेकडे पैशांची मागणी करू लागला.
तक्रारीनुसार, रजतने २९ एप्रिल रोजी क्रौर्याची परिसीमा ओलांडली व त्याने महिलेला जखमी केले. तिच्या नातेवाइकांनी तिला रुग्णालयात दाखल केले. नातेवाइकांनी रजत व त्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली असता त्याने विवाहितेच्या कुटुंबीयांना धमकावून त्यांचा अपमान केला. त्यानंतर विवाहितेने मंगळवारी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून रजतला अटक केली.
अल्पवयीन मुलीवर तरुणाकडून अत्याचार
आणखी एका प्रकरणात लग्नाचे आमिष दाखवत एका तरुणाने अल्पवयीन विद्यार्थिनीवर दोन वर्षे अत्याचार केला. २७ वर्षीय अमितेश आशिष श्रीवास याने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे वचन दिले. मागील दोन वर्षांपासून अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवत होता. काही दिवसांपूर्वी अमितेशने लग्नास नकार देत जीवे मारण्याची धमकी दिली होती. अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी बलात्कार, विनयभंग, पोक्सो आणि धमकीचा गुन्हा दाखल केला आहे.