नागपूर : शेतात चाैकीदार म्हणून काम करणाऱ्याने शेजारच्या शेतात राहणाऱ्या नऊ वर्षीय बालिका व तिच्या चुलत बहिणीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार कामठी (नवीन) पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील घाेरपड शिवारात नुकताच घडला. या प्रकरणात पाेलिसांनी आराेपीला शनिवारी (दि. २) अटक केली असून, न्यायालयाने त्याला दाेन दिवसांची पाेलीस काेठडी सुनावली आहे, अशी माहिती तपास अधिकारी तथा सहायक पाेलीस उपायुक्त नयन आलूरकर यांनी दिली.
मोहन रुपराव वानखेडे (५८, रा. सूरगाव, ता. सेलू, जिल्हा वर्धा) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. माेहन विवाहित असून, त्याची पत्नी व मुले सूरगावला राहतात, तर ताे घाेरपड (ता. कामठी) शिवारातील एका फार्म हाऊसमध्ये वर्षभरापासून चाैकीदार म्हणून काम करायचा. त्या फार्म हाऊसच्या शेजारी असलेल्या शेतात एक दाम्पत्य वास्तव्याला आहे. त्याचे सर्व कुटुंबीय माेहनच्या ओळखीचे आहेत.
दाम्पत्य शेतीच्या कामात व्यक्त असताना माेहनने त्याची नऊ वर्षीय मुलगी आणि पुतणीला खाऊ देण्याचे आमिष दाखवयचा आणि त्यांचा विनयभंग करायचा. त्यानंतर त्याने दाेन्ही अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केला. शिवाय, या प्रकाराची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. हा प्रकार एका मुलाच्या निदर्शनास आल्याने त्याने मुलीच्या आईवडिलांना सांगितला. त्यामुळे त्यांनी मुलींना विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यांनी घडलेला संपूर्ण प्रकार सांगताच पाेलिसात तक्रार दाखल करण्यात आली. हा प्रकार ३० मे ते ३० जून २०२२ या काळात सुरू हाेता, असेही त्यांनी पाेलिसांना सांगितले.
याप्रकरणी कामठी (नवीन) पाेलिसांनी भादंवि ३७६, ३५४, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा २०१२ सहकलम ४, ६, ८, १२ अन्वये गुन्हा नाेंदवून आराेपी माेहन वानखेडे यास अटक केली. कामठी शहरातील प्रथम श्रेणी न्यायालयाने त्याला मंगळवार (दि. ५)पर्यंत पाेलीस काेठडी सुनावली आहे, अशी माहिती सहायक पाेलीस उपायुक्त नयन आलूूरकर यांनी दिली.