नागपूर : केवळ चार आणि पाच वर्षांच्या दोन चिमुकल्या बालकांसोबत अनैसर्गिक कृत्य घडल्याची बाब उघडकीस आली आहे. दोन्ही बालकांचे शोषण करणारे दोन्ही आरोपी सुद्धा अल्पवयीन आहेत. उमरेड पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास याप्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनाक्रमामुळे पालक सुद्धा हादरून गेले आहेत.
उमरेड परिसरात वास्तव्यास असलेले दोन्ही बालके आणि अल्पवयीन दोन्ही आरोपी बालके शेजारीच वास्तव्यास असतात. मागील काही दिवसांपासून चार आणि पाच वर्षांच्या दोन्ही बालकांसोबत शेजारीच राहणाऱ्या १४ आणि १५ वर्षे वयाच्या बालकांनी अनैसर्गिक कृत्य केले.
ही बाब पीडित बालकांनी आपल्या आईला सांगितली. प्रारंभी पालकांनी फारसे गंभीरतेने घेतले नाही. पुन्हा असाच प्रकार घडत असल्याची बाब पीडित बालकांनी सांगितल्यानंतर उमरेड पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार नोंदविण्यात आली. पीडित आणि आरोपी बालके अशी चौघेही एकमेकांचे शेजारी आहेत. लवकरच पीडितांना वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्याची प्रक्रिया सुद्धा करीत आहोत, अशी माहिती उमरेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे यांनी दिली.
पालकांनो लक्ष द्या!
अवतीभवती असे प्रकार घडत असतात. यापैकी बहुतांश प्रकार उजेडात येत नाहीत. मोजकीच प्रकरणे पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचतात. शालेय शिक्षण घेत असतानाच ‘गुड टच -बॅड टच’ याबाबतचे शिक्षण आता अत्यंत महत्त्वाचे आहे. पालकांनीही आपल्या पाल्यास याविषयी अवगत केले पाहिजे. मुलांनी एखादी बाब सांगितली तर त्याची दखल घेणे. लक्ष ठेवणे. या बाबी सुद्धा पालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे. पालकांनो सावध राहा. लक्ष द्या. यासारख्या घटनांचा मुलांवर दूरगामी परिणाम होत असतो. मनावरही परिणाम होतात, तेव्हा पालकांनी सतर्क राहणे गरजेचे असल्याचे मत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सचिव प्रशांत सपाटे यांनी व्यक्त केले.
--