नागपूर : ‘मोडून पडला संसार तरी, तुटला नाही कणा.... पाठीवरती हात ठेवूनी नुसते लढ म्हणा...’ या पद्यओळी कोरोनाकाळात ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या आशा वर्करच्या बाबतीत ठळकपणे लागू पडतात. अल्प मोबदला, जिवाचा धोका, कुटुंबाची काळजी आणि तिरस्कार व अपमान सहन करीत गृहविलगीकरणातील रुग्णांच्या काळजीचा वसा या आशांनी यशस्वीरीत्या सांभाळला आहे. बरं या आशा समाजातील अतिशय सामान्य घरातल्या. स्वत:च्या आणि कुटुंबीयांच्या पोटासाठी अतिशय तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या महिला. त्यांच्याही आयुष्यात वेदनांची लकेर आहे. मात्र, त्या कोरोना महामारीत फ्रंटलाइन वर्कर म्हणून रुग्णांना जगण्याची ‘आशा’ देत आहेत. नागपूर ग्रामीणमध्ये कार्यरत असलेल्या काही आशा आई म्हणून कुटुंबाची व समाजाची काळजी अतिशय चोखपणे बजावत आहेत.
- व्याहाड प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या लक्ष्मी घरडे यांच्याकडे एक ते दीड हजार लोकांची जबाबदारी आहे. त्या म्हणाल्या, कोरोना सुरुवातीला गावात पोहोचला नव्हता; पण कुणाला लक्षणे दिसल्यास मला त्या रुग्णापर्यंत पोहोचून त्याची माहिती घ्यायची होती. सुरुवातीला भरपूर तिरस्कार व अपमान झाला. लोक घरात घेत नव्हते. आता तर कोरोना घराघरांत पोहोचला आहे. अशात स्वत:ची, कुटुंबाची काळजी वाढली आहे. माझ्या पतीला कोरोनाची बाधा झाली होती. रुग्णालयात भरती करण्याची वेळ आली होती. मृत्यूच्या दाढेतून त्यांना बाहेर काढले. मुलगा कसाबसा संसर्गापासून बचावला. तरीही निराश झाले नाही. गृहविलगीकरणात असलेल्या प्रत्येक रुग्णाची काळजी घेण्याची माझी जबाबदारी आहे. भीती आहे; पण हेच माझे कर्तव्य आहे.
- गेल्या बारा वर्षांपासून प्रतिमा दरवाडे या आशा वर्कर म्हणून कार्यरत आहेत. पतीच्या निधनानंतर दोन मुले व आईची जबाबदारी त्यांच्यावर आहे. आशा म्हणून सेवेचे व्रत स्वीकारल्यानंतर त्यासाठी समर्पणातून काम करीत आहे. कोरोनाने गावागावांत भीतीचे वातावरण आहे. आम्ही आशा या गावकऱ्यांसाठी आशेचे किरण ठरत आहोत. आई म्हणून मुलांचे संगोपन करणे हे कर्तव्यच आहे; पण माझी जबाबदारी समाजाप्रती आहे. ही पण परिस्थिती निघून जाईल, याच भावनेतून सेवा सुरू आहे.
- पाचगाव पीएचसीमध्ये कार्यरत असलेल्या आशा वर्कर सारिका जारोंडे यांना कोरोना काळात अनेक वेदनादायी अनुभव आले. आपले ते अनुभव सांगताना त्या म्हणाल्या, एकदा रुग्णाच्या घरी मेडिसिन पोहोचवायल्या गेली. दरम्यान, मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे रुग्णाच्या आजूबाजूच्या घरात थांबण्यासाठी गेल्या; परंतु त्यांना लोकांनी थांबू दिले नाही. लोक घरात येऊ देत नव्हते, शेजारी बोलत नव्हते, सुरुवातीला आम्हाला तिरस्कार सहन करावा लागला. काम करता करता त्या पॉझिटिव्ह झाल्या. पती आणि मुलालाही संसर्ग झाला; पण कोरोनातून तिघांनाही बाहेर काढले. पुन्हा कामाला लागले. महामारीत लढवय्या म्हणून आमचे काम सुरू आहे. प्लेगची साथ आली तेव्हा सावित्रीबाई फुलेंनी आपला जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली. त्यानुसार आशांचा आदर्श असलेल्या सावित्रीबाई फुले यांचे ध्येय सामोर ठेवून कामगिरी बजावत आहे.
- पतीच्या मृत्यूनंतर आशा वर्कर नलिनी महल्ले यांच्यावर दोन मुली व मुलाची जबाबदारी आली. परिस्थितीवर मात करण्यासाठी अल्प मानधनावर आशा स्वयंसेविका म्हणून त्या रुजू झाल्या. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी फावल्या वेळात मिळेल ते काम करू लागल्या. मुले मोठी झालीत. नोकरीलाही लागली; पण त्यांनी आशाचा वसा सोडला नाही. कोरोना महामारीत गृहविलगीकरणात असलेल्या रुग्णांची काळजी त्या सातत्याने घेत आहेत.
- उषा शेंडे या आशा स्वयंसेविका म्हणून कार्यरत आहेत. पती नसल्याने मुला-मुलीची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. कोरोना महामारीच्या काळात गृहविलगीकरणातील रुग्णांचे आरोग्य जपताना त्यासुद्धा पॉझिटिव्ह झाल्या. त्यात त्यांच्या मुलीलीही संसर्ग झाला. स्वत:ची, मुलीची काळजी घेत, त्यांनी आपली जबाबदारी चोखपणे बजावली. गृहविलगीकरणातील रुग्णांना फोनवरून संपर्क करून त्यांच्या आरोग्याची विचारणा केली. प्रशासनाला आवश्यक असलेली माहिती नियमित पाठविली. काम करीत असताना अनेक अडचणीही आल्यात; पण त्यावर मात करून त्या दूर करण्याचा प्रयत्न केला.