नागपूर : धावत्या ट्रेनमध्ये तिला प्रसव कळा सुरू झाल्या. तिच्या वेदनांनी कुटुंबिय घाबरले. मात्र, या प्रकाराची माहिती कळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवली अन् त्यांच्या मदतीमुळे महिलेने एका गुटगुटीत बालकाला जन्म दिला.
ट्रेन नंबर १८०२९ लोकमान्य टिळक टर्मिनस शालीमार एक्सप्रेसने बुधवारी दुपारी नागपूर रेल्वेस्थानकावरून भंडाराकडे प्रस्थान केले. या ट्रेनमध्ये एक २८ वर्षीय गर्भवती महिला तिच्या कुटुंबीयांसह (कोच नंबर बी - ५/ बर्थ ४२/४३) प्रवास करीत होती. त्यांना नाशिकहून दुर्ग छत्तीसगड येथे जायचे होते. रेल्वेने गती पकडताच महिलेला प्रसव वेदना सुरू झाल्या. यामुळे घरची मंडळी घाबरली. डब्यातील प्रवाशांनी ही माहिती कोच नियंत्रकांना दिली. त्यांनी लगेच भंडारा स्थानकावर माहिती देऊन तातडीच्या वैद्यकीय मदतीची मागण नोंदवली.
त्यानुसार, भंडारा रोडचे स्टेशन मास्टर सुधांशू शेखर यांनी आपल्या सहकाऱ्यांकडून लगेच मदतीची तयारी केली. दुपारी ३.१६ वाजता शालीमार एक्सप्रेस भंडारा स्थानकावर थांबली. वैद्यकीय पथकाने आरपीएफच्या मदतीने महिलेला उतरवून प्राथमिक आरोग्य केंद्र वरठी (भंडारा) येथे नेण्याची तयारी केली. आरोग्य केंद्रात पोहचण्यापूर्वीच महिलेने एका बालकाला जन्म दिला. आता नवजात शिशू अन् त्याच्या आईची प्रकृती चांगली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांकडून तातडीने मदत मिळाल्यामुळेच हे सर्व चांगले झाले, अशी भावना व्यक्त करून महिलेच्या कुटुंबीयांनी त्यांचे आभार मानले.