नागपूर : विधिमंडळाच्या तिसऱ्या दिवसाचे काम आज सुरू झाले. आजही महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद मुद्दा गाजला. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भाषा अरेरावी व उद्दामपणाची आहे. सहन करण्याची मर्यादा असेत. आमचा संयम सुटत आहे. त्यांना त्यांच्या भाषेच उत्तर देऊ. मराठी भाषींवर अन्याय केला तर उन्हाळ्यात त्यांना देण्यात येणाऱ्या पाण्याचा विचार करू, असा इशारा उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांना आज विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलताना दिला.
ते म्हणाले की, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य हे भकविणारे आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेच्या अनुसरून नाही. सीमावर्ती भागातील जनतेला घाबरण्याचे कारण नाही. त्यांच्या पाठिशी राज्यातील संपूर्ण जनता आहे. एकही इंज जागा न देण्याची भाषा करीत आहे. एक इंच काय आम्ही अर्धी इंचही जागा देणार नाही. त्यांनी अरेरावीची भाषा थांबविली नाही, तर त्याच्या शंभर पट पटीने आम्हाला बोलता येते, असे देसाई म्हणाले.
छत्रपत्री शिवाजी महाराज यांनी दक्षिण दिग्विजय केला होता. याची आठवण त्यांना असावी. मार्च, एप्रिल व मे महिन्यात त्यांना पाण्याची गरज असते. राज्यातील कोयना व कृष्णा नदीतून पाणी देण्यात येते. पाण्यासाठी त्यांच्याकडून राज्याला विनंत करण्यात येते. त्यांचे वागणे असेच राहिले तर उन्हाळ्यात देण्यात येणाऱ्या पाण्याचा विचार करावा लागेल, असे ते म्हणाले.
सीमावादावर ठराव आणा, जशास तसे उत्तर द्या - अजित पवार
कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई सातत्याने तिथल्या लोकांना बरं वाटावं म्हणून आक्रमक वक्तव्य करीत आहेत. आपल्यादेखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी यावर आक्रमक भूमिका घेत जशास तसे उत्तर द्यायला हवे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या कार्यकारी समितीच्या बैठकीत सीमावादावरील ठराव आणण्याबाबत चर्चा झाली होती. तेव्हा सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात हा ठराव कधी मांडणार याबाबत आम्ही सरकारला विचारणा आहे. सीमाभागातील एकेक इंच जागा महाराष्ट्रात आली पाहिजे, हिच आमची भूमिका आहे असे पवार यांनी सांगितलं.