नागपूर : पुलवामा घटनेच्या मागे एक मोठे षडयंत्र लपलेले आहे हे जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून स्पष्ट होते. सत्यपाल मलिक यांना गप्प बसण्यास का सांगितले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री यांनी सत्य का लपवले, अशी विचारणा करीत नागपूर शहर काँग्रेसतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘शर्म करो’ आंदोलन करण्यात आले.
काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकेर यांच्या नेतृत्त्वात व्यापारी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अतुल कोटेचा, सोशल मिडिया सेलचे प्रदेश अध्यक्ष विशाल मुत्तेमवार, माजी नगरसेवक प्रशांत धवड, संदेश सिंगलकर, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष नॅश अलि यांच्यासह कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी आ. विकास ठाकरे म्हणाले, पुलवामा घटना ही सरकारची चुक आहे, असे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सांगितल्यावर त्यांना गप्प राहण्यास का सांगितले? सीआरपीएफच्या ४० जवानांना स्फोटाने उडवून देण्यात आले.
एवढी मोठी घटना घडली तरी अद्याप या घटनेचे सत्य बाहेर आलेले नाही. या घटनेच्या तपासाचे काय झाले? या स्फोटात ३०० किलो आरडीएक्स वापरण्यात आले. ते कुठून आले, जवानांना विमानसेवा का पुरवली नाही, गुप्तचर यंत्रणांच्या इशाऱ्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले का, आदी बाबींची सखोल चौकशी होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
पोलिसांनी रोखल्याने कार्यकर्ते आक्रमक
- जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरू असताना खबरदारी म्हणून पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार बंद केले. आंदोलकांनी जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन देण्याचा आग्रह धरला असता पोलिसांनी नकार दिला. यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले व गेटवरून चढण्याचा प्रयत्न करू लागले. यावेळी पोलिस व कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. शेवटी शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्यासह निवडक प्रतिनिधींना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांची भेट घेण्याची परवानगी देण्यात आली. यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सोपविले.