आयुक्तांकडून गंभीर दखल - -तडकाफडकी उचलबांगडी
-----------------------
- पोलीस उपायुक्तांकडून चाैकशी
- गुन्हा दाखल झाल्यास निलंबनाची शक्यता
लोकमत न्यूज नेटर्वक
नागपूर - यशोधरानगरचे ठाणेदार अशोक मेश्राम यांनी आपल्याशी लज्जास्पद वर्तन केल्याची तक्रार महिला होमगार्डने बुधवारी सायंकाळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे केली. त्याची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी मेश्राम यांची तडकाफडकी ठाणेदाराच्या पदावरून उचलबांगडी केली. दरम्यान, या घडामोडीचे वृत्त वायुवेगाने सर्वत्र पोहचले. त्यामुळे सर्वत्र प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.
अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाणेदार मेश्राम यांच्या कक्षासमोर गार्ड ड्युटी करणाऱ्या एका महिला होमगार्डला सोमवारी सायंकाळी मेश्रामने आपल्या कक्षात बोलविले. तिला लाईन गार्ड (वर्दीच्या खांद्यावर असलेली दोरी)चे बटन लावून मागण्याच्या बहाण्याने तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. या प्रकारामुळे घाबरलेली होमगार्ड पोलीस ठाण्याच्या कोपऱ्यात जाऊन रडत बसली. काही वेळेनंतर मेश्रामने पुन्हा आपल्या टेबलवरची कॉलबेल दाबली. त्यामुळे दुसरी एक महिला गार्ड त्यांच्या कक्षात आली. यावेळी त्यांनी ‘तू का आली, आधीची कुठे आहे’ अशी विचारणा करून दमदाटी केल्याचे समजते. या प्रकारामुळे पीडित होमगार्ड महिलेने पोलीस ठाण्यात काही वेळेपूर्वी ठाणेदाराने केलेल्या आक्षेपार्ह वर्तनाचा बोभाटा केला. हे प्रकरण पोलीस उपायुक्त नीलोत्पल आणि नंतर अतिरिक्त आयुक्त नवीनचंद्र रेड्डी तसेच पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याकडे पोहचले. त्यांनी प्रकरणाची गंभीर दखल घेतली. मेश्राम यांची गुरुवारी सकाळीच ठाण्यातून उचलबांगडी करण्यात आली. दुपारी रीतसर आदेश काढून त्यांना नियंत्रण कक्षात रुजू होण्याचे आदेश देण्यात आले. या घडामोडीचे वृत्त शहरात वायुवेगाने पसरले अन् पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्तांनी परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त विनीता साहू यांच्याकडे चाैकशी दिली. साहू यांनी लगेच पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. आज दिवसभर पीडित महिला होमगार्ड, तसेच ठाण्यात अन्य काही महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांची चौकशी केली. चाैकशीत अनेक महिलांनी मेश्राम यांच्या नावाने शिमगा केल्याचे समजते. दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल होण्याचे संकेत आहेत. तसे झाल्यास मेश्राम यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते, असेही अधिकारी सांगतात.
---
चारवेळा बचावले
विशेष म्हणजे, मेश्राम यापूर्वी चारवेळा अशाच प्रकारे वादग्रस्त प्रकरणात चर्चेला आले. दोन वर्षांपूर्वी लुटेरी दुल्हनशी सलगी त्यांना अडचणीत आणणारी ठरली होती. नंतर नंदनवनमधील जनावराच्या प्रकरणात त्यांचा डिफॉल्ट समोर आला. या दोन्ही प्रकरणात वरिष्ठांनी त्यांची कानउघाडणी केली होती. त्यानंतर यशोधरानगर पोलीस ठाण्यात एका अधिकाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणात त्यांचा राईट हॅण्ड चव्हाण अडकला. मेश्रावरही गुन्हा दाखल झाला. मात्र, थेट संबंध नसल्याने त्यावेळी ते बचावले. गेल्या महिन्यात धान्याचा काळाबाजार करणाऱ्याचे आणि त्याच्याकडून वसुली करण्याचे प्रकरण उघड झाले. यावेळी मेश्रामच्या वतीने वसुली करणाऱ्या एका पीएसआयसह चाैघांना पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी तडकाफडकी निलंबित केले. मात्र, याहीवेळी मेश्राम बचावले.
---
दुपारी इशारा, सायंकाळी गैरवर्तन
अमितेशकुमार यांनी बुधवारी दुपारी २.३० वाजेपर्यंत क्राईम मिटिंग घेतली. या मिटिंगमध्येच त्यांनी मेश्राम यांना वर्तन सुधारण्याचा सल्ला दिला होता. पुन्हा काही कानावर आले तर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला होता. मात्र, त्याचा काही फायदा झाला नाही. मेश्राम सायंकाळी पोलीस ठाण्यात पोहचले अन् त्यांनी हा लज्जास्पद प्रकार केला.
---